अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-कामगार व शेतकरी कायद्यांना विरोध करण्यासाठी विविध कामगार संघटनांनी २६ नोव्हेंबरला देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
शेतकरी विरोधी कृषि कायदे व कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करा या व इतर मागण्यांसाठी देशभरातील १० केंद्रीय कामगार संघटना यांनी २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला २५० पेक्षा ही जास्त किसान संघटनांनी पाठीबा दिला आहे.
तसेच केंद्राच्या या जाचक कायद्यांना सर्वच स्तरातून विरोध होत असून आता इंटकसह इतर कामगार संघटनाही मैदानात उतरल्या आहेत. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री थोरात म्हणाले की, कामगारांच्या हक्कांचे रक्षण व्हावे यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांनी ४४ कामगार कायदे बनविले.
कामगारांवर अत्याचार होऊ नये या हेतूने त्यांना संरक्षण देण्याचे काम या कायद्याच्या माध्यमातून होत आले आहे. परंतु केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आणलेले कायदे हे कामगारांना देशोधडीला लावणारे तसेच बड्या उद्योगपतींचे गुलाम बनवणारे आहेत. हे कायदे बनवताना मोदी सरकारने संसदेत तसेच इतर कोणाशीही चर्चा केली नाही.
काही निवडक उद्योगपतींच्या हितासाठी कामगारांना उद्धवस्त करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा पूर्ण पाठिंबा आहे
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved