अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-शहरातील डावरे गल्ली येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांची 750 वी जयंती मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. जयंती उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी महेश जाधव यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची तसेच नामदेव महाराजांच्या मूर्तीस अभिषेक घालून पूजा करण्यात आली. पूजेनंतर भाविकांच्या उपस्थितीमध्ये भजनाचा कार्यक्रम रंगला होता. भजन-किर्तन कार्यक्रमात ह.भ.प. भाबड महाराज, काळे महाराज, तबलावादक शेखर दरवडे, महेश जाधव यांनी अभंग, भावगीत व भक्ती गीताने सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी नामदेव शिंपी समाज ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे, ज्ञानेश्वर पवार, सचिव सुरेश चुटके, सहसचिव दिलीप गिते, संचालक ज्ञानेश्वर कविटकर, अनिल गिते, उमेश गिते, प्रसाद मांढरे, अरुण जवळेकर, रामशेठ पवार, अॅड.निलेश पवार, अशोक जाधव, अजय कविटकर, मच्छिंद्र चांडवले, शरद चांडवले, राजश्री मांढरे, शोभना गिते, अनिता गिते, स्मिता गिते, नुतन पवार, नानी जाधव, माधवी मांढरे, पल्लवी रहाणे, कल्पना जाधव आदिंसह समाजबांधवांसह भाविक उपस्थित होते.
ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे म्हणाले की, संत नामदेव महाराजांनी कीर्तनरुपी ज्ञानाच्या दीपातून समाज प्रकाशमान केले. या दिव्याच्या उजेडात सर्व समाज उजळून निघाला. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला संघटित व जागृक करण्याचे कार्य केले. भक्ती करण्याचा किंवा ज्ञान सांगण्याचा जो अधिकार होता तो संकुचित झाला होता. त्याच्या कक्षा रुंदावण्याचे काम नामदेव महाराजांनी केले.
म्हणूनच नामदेव महाराजांच्या काळात जेवढे संत महाराष्ट्रात निर्माण झाले तेवढे एकाच वेळी पुढे कधी झाले नाहीत. कारण नामदेवाने आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला त्याच्या हक्काची आणि अधिकाराची जाणीव करून दिली. आजही त्यांचे विचार व शिकवण प्रेरणादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन हा धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. श्री नामदेव महाराजांच्या जयंती निमित्त श्री नामदेव विठ्ठल मंदिरास आकर्षक फुलांची सजावट करुन विद्युत रोषणाई करण्यात आली होती. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved