अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी बिबट्यास पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे.
मात्र या बिबट्याला जंगलात सोडण्यावरून एक नवीनच वाद उफाळला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी शिवारातील दिघी चारी परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात दोन दिवसांपूर्वी अडकलेला बिबट्या वन विभागाने नाऊर परिसरात जखमी अवस्थेत सोडून दिल्याचे समोर आले आहे.

एका ठिकाणाहून जेरबंद केलेला बिबट्या केवळ चार किलोमीटरवर सोडल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची चौकशीची मागणी केली आहे. वन विभागाने नागरिकांची दिशाभूल केली असून, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नाऊर व जाफराबाद ग्रामस्थांनी केली आहे.
निमगाव खैरी परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्यास अभयारण्यात सोडण्याऐवजी केवळ चार किलोमीटरवरील नाऊर परिसरात सोडल्याचे समोर आल्याने, वन विभागाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
नागरिकांची दिशाभूल करणारे वन अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved