अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.
नुकतीच चांदबीबी महाल या पर्यटनस्थळाच्या आसपास बिबट्याचे दर्शन झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यानंतर आता नगर-सोलापूर रोडवर वाटेफळ-साकतच्या शिवेवर बिबटयाचे दर्शन घडल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
रुई छ्त्तीसी येथील संगणक शिक्षक नितीन काकडे हे शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान नगरकडे जात असताना वाटेफळ व साकतच्या शिवेवर ते थांबले. यावेळी त्यांना शंभर ते दीडशे मिटर अंतरावर नगर-सोलापूर रस्ता पार करताना बिबट्यांचे दर्शन झाले. यामुळे ते भयभीत होऊन मार्गस्थ झाले.
त्यानंतर साकतखुर्द, वाटेफळमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून दवंडी देण्यात आली. बिबट्याच्या धास्तीने परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच रविवारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन नागरिकांना खबरदारिच्या उपाययोजना बद्दल माहिती सांगितली.
तालुक्यातील बिबट्यांचा वावर हा शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय बनला असून तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गुराख्यांनी एकत्र जनावरे संभाळावीत, तसेच रात्रीच्या वेळी बाहेर फिरणे टाळावे, तसेच जनावरे शेळ्या बंदिस्त ठेवण्याचे आवाहन केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved