अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- राज्यातील उद्धव ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली. पण राज्यातील जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी, कायदा आणि सुव्यवस्था, आपत्तीच्या काळातील नुकसान भरपाई अशा सर्वच आघाड्यांवर राज्य सरकार अपयशी ठरले असून कोरोनाच्या काळात तीन हजार कोटीचा भ्रष्टाचार सरकारने केला, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज येथे केले.
येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत राणे म्हणाले, ठाकरे सरकारी वर्षपूर्ती म्हणजे राज्य अधोगतीकडे नेणारे वर्ष आहे. करोनाच्या काळात सरकारने १२ हजार कोटी रुपये खर्च केले. त्यातील कामे नातेवाईक आणि जवळच्यांना दिली. त्यात ३ हजार कोटीचा भ्रष्टाचार केला. हे हे पापी आणि उद्धव नव्हे; तर उद्ध्वस्त सरकार आहे. शेतकरी, मजूर, नोकरदार, बेरोजगार, सर्वसामान्य, व्यापारी आदींच्या जीवनात कोणतेही परिवर्तन होईल, असे काम सरकारने केलेले नाही.
मुख्यमंत्री मुलाखत देतात, मात्र त्या मुलाखतीमध्ये आपण काय विकास केला, याचा उल्लेख नाही. आपल्याच वृत्तपत्रात मुलाखत देऊन बढाया मारणाऱ्यांनी राज्याला या सहा महिन्यांत ६० हजार कोटीच्या कर्जाच्या खाईत लोटले आहे. मुख्यमंत्र्यांचा पायगुण असा की ते आले आणि करोना आला. सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. इतर कोणत्याच बाबतीत पहिल्या क्रमांकावर नसलेला महाराष्ट्र करोनाच्या मृतांच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे.
करोनाच्या रुग्णांवर उपाययोजना करण्यात सरकार कमी पडले, म्हणूनच मृतांची संख्या वाढली. हेच त्यांचे कर्तृत्व. हात धुऊन मागे लागणार, असे त्यांनी मुलाखतीत सांगितले आहे. पण कोणाच्या मागे लागणार, तेही सांगा. एक वेळ अशी येईल की, जनताच आपल्या मागे हात धुऊन लागेल आणि तुम्हालाच सत्तेवरून खाली उतरेल. शेतक-यांना कर्जमाफी दिली. मात्र, ती तुटपुंजी दिली. फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी १८ हजार कोटींची मदत जाहीर केली आणि त्याचे वाटपही केले.
राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलीच नाही. तरुणी, महिलांवर अत्याचार वाढले आहेत. महिलांच्या संरक्षणासाठी पोलीस यंत्रणा लावण्याऐवजी स्वतःसाठी यंत्रणा वापरली जात आहे. खून होत आहेत आणि ती आत्महत्या दाखविली जात आहे, असे सूडाचे राजकारण केले जात आहे. राजकारण करून पत्रकारांवर केसेस होत आहेत. पत्रकारांना आशा पद्धतीने वागणूक देणारे महाराष्ट्रातील हे पहिले मुख्यमंत्री आहेत. हिंदुत्वाबाबत तर ठाकरेंनी बोलूच नये.
इतिहासातील हा पहिला मुख्यमंत्री आहे, जो घरात बसून काम करतो. अर्णव गोस्वामीसारख्या पत्रकारांना मारझोड केली गेली, अशी वागणूक देणारे हे पहिले मुख्यमंत्री आहेत. वीजबिल माफीची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात काहीच नाही. हे सरकार निकामी आहे. सुशांतसिंगचादेखील खून झाला आहे. पण यांच्या राजवटीत हा खून आत्महत्या म्हणून पचवण्यात येत आहे. ही उद्धवशाही नसून ही बेबंदशाही आहे. मुंबईतील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे नेण्यामुळे ४ हजार कोटींचा भुर्दंड पडणार आहे. रत्नागिरीतील आरोग्य सेवेसाठी दहा हजार कोटी खर्च झाले आहेत.
या जिल्ह्याला जिल्हा नियोजनासाठी २११ कोटी मंजूर झाले. त्यापैकी ६९ कोटी फक्त आले. त्यातील ३४ कोटी करोनासाठी खर्च झाला. कसा विकास होणार ? कोकणातून शिवसेनेला हद्दपार केल्याशिवाय कोकणाचा विकास होणार नाही. ठाकरे यांनी भाजपशी बेईमानी केली, हिंदुत्वाला मूठमाती दिली. गद्दारी करून मुख्यमंत्रिपद मिळविले. कर्तृत्वाने नाही, असेही राणे म्हणाले.
केवळ १७ लाखाच्या रत्नागिरीच्या पाणी योजनेसाठी एक कोटी २७ लाखाचा निधी मंजूर केल्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, अशा भ्रष्टाचाराच्या एककलमी कार्यक्रमातून मुक्ती मिळवायची असेल, भारतीय जनता पक्षाला जनतेने संधी द्या. ही पाणी योजना म्हणजे मिलके खायेंगे, जमके खायेंगे अशी आहे. अशाच पद्धतीने मुंबईत दहिसर येथील जागेचा व्यवहार शिवसेनेने केल्याची टीका राणे यांनी केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved