देशात कृषी कायद्यावरून भ्रम पसरवला जातोय- पंतप्रधान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- देशात कृषी कायद्यांवरून भ्रम पसरवला जात असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सोमवारी केली. उत्तरप्रदेशातील वाराणसी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, देशात कृषी कायद्यावरून शेतक-यांची दिशाभूल केली जाते. यापूर्वी जर केंद्र सरकारचा एखादा निर्ण मान्य नसेल तर त्याला विरोध व्हायचा.

परंतु, हल्ली निर्णयाला विरोध करण्याऐवजी त्याबाबत अफवा आणि भ्रम पसरवला जातो. एखाद्या चांगल्या निर्णयाबाबत अकारण अपप्रचार करायचा. शेतकऱ्यांचा पुळका आला आहे असे दाखवणाऱ्या लोकांनी गेल्या काही दशकांपासून शेतकऱ्यांना छळले आहे असा टोला त्यांनी लगावला. केंद्र सरकारने आणलेले कायदे हे शेतकऱ्यांचे बळ वाढवणारे आहेत. मोठ्या बाजारांपेठांची दारे खुली करणारे आहेत.

मात्र विरोधक ही बाब समजून न घेता या कायद्यांमुळे कसे दुष्परिणाम होत आहेत हा भ्रम अकारण पसरवला जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारतातली कृषी उत्पादनं सगळ्या जगात प्रसिद्ध आहेत. मग शेतकऱ्याने त्याची उत्पादने मोठ्या बाजारपेठेत आणि जास्त किंमतींपर्यंत पोहचवायची नाहीत का ? जर कुणाला असे वाटत असेल की याआधीच सुरु असलेली पद्धतच योग्य आहे तर त्यासाठी त्याला कुणी अडवले आहे ? पूर्वी बाजारपेठांच्या बाहेर सुरु असणारे व्यवहार हे बेकायदेशीर होते. त्यावेळी छोट्या शेतकऱ्यांना हातोहात फसवलं जात असे.

मात्र आता छोटा शेतकरीही अशा प्रकारांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी करु शकतो. या मध्ये गैर काय आहे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांच्या नावाने अनेक योजनांची घोषणा केली जायची. पण ते स्वत: मान्य करत होते की योजना 1 रुपयाची असेल तर फक्त 15 पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत होते, अशी टीकाही मोदींनी काँग्रेसवर केलीय. काँग्रेस सरकारच्या काळात किमान आधारभूत किमतीची घोषणा तर केली जायची पण त्यानुसार फार कमी खरेदी केली जात होती.

त्यांच्या काळात एमएसपी आणि कर्जमाफीवरुनही शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोपही मोदींनी केलाय. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार एकूण खर्चाच्या दीड पट एमएसपी देण्याचे वचन आम्ही दिले होते. हे वचन आम्ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यापर्यंत ते पोहोचवल्याचा दावा त्यांनी केला. हे तेच लोक आहेत, जे पीएम किसान सन्मान निधीबाबत प्रश्न उपस्थित करत होते. ते अफवा परसत होते की निवडणुकीच्या तोंडावर ही घोषणा करण्यात आली आहे. पण आज शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेतून चार पैसे जात आहेत. आतापर्यंत एक लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment