टोकियो : जपानच्या ओसाका शहरामध्ये एक प्रसिद्ध कॉफी हाउस असून तिथे २२ वर्षांपूर्वीची कॉफी मिळते. या कॉफीच्या एका कपासाठी तब्बल ६५ हजार रुपये मोजावे लागतात. ती जगातील सर्वात जुनी व सर्वात महागडी कॉफी म्हणून ओळखली जाते.
आपल्या खास चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या या कॉफीची सुरुवात एक गफलतीतून झाली होती. त्यानंतर ती जगभरात नावारुपास आली. मंच हाउस नावाचे हे कॉफी हाउस जगातील एकमेव असा कॅफे आहे, जिथे दोन दशकांपेक्षा जास्त जुनी कॉफी दिली जाते.
या कॅफेचा मालक तनाका कधीकाळी आइस कॉफी विकत होता. कॉफी लवकर तयार करया यावाी म्हणून तो ती फ्रिजमध्ये ठेवत असे. मात्र एकदा कॉफीची काही पाकिटे तो फ्रिजमध्येच विसरला. ती दीड वर्षे तशीच राहिली. त्यानंतर तनाकाची नजर तिच्यावर पडल्यावर त्याने ती फेकण्याऐवजी तिची कॉफी तयार केली. एवढ्या वर्षांनी कॉफीची चव किती बदलली, हे जाणून घेण्याची त्याची इच्छा होती.
तनाकाने सांगितले की, दीड वर्षांपूर्वीची कॉफी दळून बनविली असता ती अजूनही पिण्यालायक होती. तिचा एक वेगळाच सुगंध आणि स्वाद होता. तेव्हापासून त्याने अनेक वर्षे कॉफी साठवून ठेवण्याचा व एका नव्या चवीची कॉफी ग्राहकांना पाजण्याचा निर्णय घेतला.
तनाकाने कॉफी दहा वर्षे साठवून ठेवण्यासाठी छोट्याछोट्या लाकडी बॅरेलचा वापर केला. दहा वर्षांनी तिची चव चाखली असता तिची चव एखाद्या सिरपप्रमाणे होती, तर २० वर्षे साठविलेल्या कॉफीची चव अल्कोहलसारखी होती.