अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- केवळ दोनच दिवसांचे अधिवेशन असल्याने विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आपली नाराजी व्यक्त केली. तसेच, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला असलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालत ठाकरे सरकारला खोचक टोलादेखील लगावला. चहापानाला जाण्याचा विषयच उद्भवत नाही.
महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्याची सत्ताधाऱ्यांची इच्छा नाही तर मग चहापान कशासाठी करताय? मला असं वाटतं की यापुढे चहापान कार्यक्रम बंद करून टाकावा. कारण दोन दिवस चालणाऱ्या अधिवेशनात कोणकोणते मुद्दे चर्चेसाठी यायला हवे याची चर्चा करण्याच्या उद्देशाने चहापान कार्यक्रम आयोजित केला जातो.
हाच या कार्यक्रमाचा मुख्य हेतू असतो. पण मुळात दोन दिवसांच्या अधिवेशनात सत्ताधारी काय करणार हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. सत्ताधारी लोक केवळ गोंधळ घालून काहीही कामकाज होऊ देणार नाहीत.
केवळ आवाजी मतदानाच्या नावाखाली सत्ताधारी पक्ष पुरवण्या मागण्या मान्य करून घेणार. मग चहापानाचा कार्यक्रम कशाला करायचा… आम्हाला आमच्या घरी चहा मिळत नाही का?” असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला लगावला.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com