दुखःद बातमी : भारताचे पहिले हिंदकेसरी हरपले !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचं कोल्हापुरात निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते अनेक व्याधींनी त्रस्त होते.

खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा हे श्रीपती शंकर खंचनाळे यांचे मूळ गाव. 10 डिसेंबर 1934 रोजी खंचनाळे यांचा जन्म झाला. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रीपती खंचनाळे यांना लहानपणापासूनच शारीरिक कसरती आणि कुस्तीची आवड होती. याच आवडीतून त्यांनी बालवयातच कोल्हापुरातील शाहुपुरी तालीम गाठली आणि आपला कुस्तीचा सराव सुरु केला.

कुस्तीतला जिगरबाज हिरा कायमचा लुप्त :- सारे जीवन लाल मातीतील कुस्तीला वाहून घेतलेला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर धडक दिलेला नामांकित मल्ल अशी खंचनाळे यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने कुस्तीतला जिगरबाज हिरा कायमचा लुप्त झाला. दिल्लीत ३ मे १९५९ रोजी झालेल्या लढतीत बत्तासिंगला चितपट करून ते हिंदकेसरी झाले होते. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे ही लढत पाहण्यास आवर्जून उपस्थित होते.

वृद्धापकाळाने आलेल्या व्याधीमुळे प्राणज्योत मालवली ! :- सारे शरीर खिळखिळे झाल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांना कंबरदुखीचा त्रास होता. त्यातच वृद्धापकाळाने आलेल्या व्याधीमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी शांता, मुले सत्यजित, रोहित आणि विवाहित मुलगी पौर्णिमा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

यशवंतराव चव्हाण यांनीही कौतुकाची थाप मारली होती…. :- महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार, तर कर्नाटक शासनाच्या कर्नाटक भूषण ह्या पुरस्काराने त्यांचा गौरव झाला होता. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली होती.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment