लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेला लुटले

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-जामखेड तालुक्यातील खर्डा येथील बस स्थानकावर गावी जाणाऱ्या महिलेला लिप्ट देण्याच्या बहाण्याने कारमधून बसवून तिला लुटल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी रविवारी दिनांक १३ डिसेंबर रोजी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

फिर्यादी महिला भूम तालुक्यातील नलेवडगाव येथे जाण्यासाठी खर्डा बस स्थानकावर वाहनाची वाट पाहत असताना एक जण तेथे कार घेऊन आला.

त्याने या महिलेस गावी जाण्यासाठी लिप्ट दिली. वाहन पुढे जाऊन खर्डा किल्ल्याजवळ थांबवून आणखी अनोळखी चार व्यक्ती कारमध्ये बसले.

शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने महिलेचे तोंड दाबले, इतर दोघांनी गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले. तिच्याकडे असलेले तीन हजार रुपये व मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतले.

असा एकूण ६४ हजारांचा ऐवज लुटण्यात आला आणि त्या महिलेला सोडून दिले. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.