महत्त्वाची बातमी : नवीन दुचाकी वाहनांसाठी पसंतीचा क्रमांक घेण्याची संधी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांकरिता दिनांक २२ डिसेंबर, २०२० रोजी नवीन वाहन मालिका सुरु करण्यात येत आहे.

इच्छुक अर्जदारांनी आजपासून (दि. १५) ते दिनांक १८ डिसेंबर, २०२० या कालावधीत सकाळी १० ते दुपारी २-३० वाजेपर्यंत पसंती क्रमांकासाठी विहित पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केले आहे.

इच्छुक अर्जदारांनी पसंती क्रमांकाच्या विहित शुल्कासह डिमांड ड्राफ्टसह अर्ज अहमदनगर शहरातील चांदणी चौकातील नवीन इमारतीत खिडकी क्रमांक १४ येथे जमा करावेत. वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांच्या पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड (फोटो आयडी- भ्रमणध्वनी व ईमेल आयडी सह) जोडावा.

पसंती क्रमांक शुल्काचा डिमांड ड्राफ्ट, डेप्युटी आरटीओ, अहमदनगर या नावाने काढावा. डिमांड ड्राफ्ट राष्ट्रीयकृत बॅंकेचा असावा. स्टेट बॅंकेचा डिमांड ड्राफ्ट असल्यास सदर डिमांड ड्राफ्ट अहमदनगर कॅम्प शाखा/ट्रेझरी शाखास कोड नं. १३२९६ करिता देय असावा.

एकाच पसंतीक्रमासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले तर त्या पसंती क्रमांकाची यादी दिनांक १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता चांदनी चौकातील नवीन इमारतीच्या प्रवेशद्वारावर प्रदर्शित करण्यात येईल. उपरोक्त यादीत असलेल्या पसंतीक्रमासाठी ज्यांनी अर्ज केला आहे,

अशाच अर्जदारांनी दिनांक २१ डिसेंबर रोजी दुपारी २-३० वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठीच्या पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राप्ट व्यतिरिक्त जादा रकमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सीलबंद करुन खिडकी क्रमांक १४ येथे जमा करावा.

एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन बंद सीलबंद लिफाफ्यात सादर केलेल्या जादा रकमेचा डिमांड ड्राफ्ट धारकांनी दिनांक २१ डिसेंबर  रोजी सायंकाळी ४-३० वाजता कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपस्थित राहावे. कार्यालयात सादर झालेले जादा रकमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारांसमोर उघडण्यात येतील.

ज्या अर्जदाराने जास्त रकमेचा ड्राफ्ट सादर केला असेल त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल. उर्वरित कमी रकमेचा ड्राफ्ट संबंधीत अर्जदारांना परत देण्यात येईल तसेच विहित वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठल्याही प्रकारचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दूरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे श्री. पाटील यांनी कळविले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment