नवे आर्थिक वर्ष सुरू होते, तेव्हा कंपन्यांमधली कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे वेध लागतात. यावेळी प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. मात्र अप्रायजल लेटर हाती येते तेव्हा अनेकांच्या वाट्याला अपेक्षाभंग येतो.
परंतु, अमेरिकेतील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एवढी पगारवाढ दिली आहे की, तुम्ही त्याची कल्पनाही करणार नाही. या कंपनीचा पगारवाढीचा आकडा ऐकून नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. अमेरिकेच्या इडाहोमध्ये ‘ग्रॅव्हिटी पेमेंट्स’ नावाची ही कंपनी असून डॅन प्राइस तिचे मुख्य कार्यकारी आहेत.
डॅन यांनी यांच्या कंपनीतील लोकांचा वार्षिख पगार दहा हजार डॉलर म्हणजे तब्बल ७ लाख ११ हजार रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. असे सांगितले जाते की, या कंपनीतील सर्वात कमी पगार असलेला कर्मचारीही वर्षाला २८ लाख ४२ हजार रुपये कमावतो. एवढेच नाही तर आगामी पाच वर्षांत कर्मचाऱ्यांचया पगारात ४९ लाखांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
डॅन यांची ही कंपनी क्रेडिट कार्ड प्रोसेसिंगचा व्यवसाय करते. हल्लीच या कंपनीने चार्ज आयटीप्रो नामक कंपनी विकत घेतली. या नव्या कंपनीच्या ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी काही खास घोषणा करण्यात आल्या आहेत. २०१५मध्ये डॅन यांनी स्वत:च्या पगारात ८० ते ९० टक्के कपात केली होती. तेव्हाच त्यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांना ७० हजार डॉलर पगाराची घोषणा केली होती.