दरोड्याच्या तयारीतील टोळीला पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला घारगाव पोलिसांनी डोळासणे येथे गुरुवारी (ता.17) मध्यरात्री जेरबंद केले आहे. विशेषबाब म्हणजे या टोळीतील पाच जणांपैकी दोघेजण अल्पवयीन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी मध्यरात्री घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील वाहनातून गस्त घालत होते. त्याचवेळी पोलीस निरीक्षक पाटील यांना गुप्त खबर्‍यामार्फत फोन आला की, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे येथील पुलाखाली अंधारामध्ये एक पिकअप थांबली असून,

अंधाराचा फायदा घेऊन पाच जण दबा धरून बसले आहे. माहिती मिळताच पथक घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी त्यातील तिघांना कसोशीने पकडले. त्याचवेळी दोघे जण पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग मोठ्या शिताफीने त्यांचाही बंदोबस्त केला.

पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता सतीश उर्फ चिक्या बाळू वाळे (वय 20), संतोष जालिंदर गुरुकुले (वय 20) व श्याम रामकृष्ण मोरे (वय 24) सर्वजण झोळे येथील असून, इतर दोघे अल्पवयीन आहेत. दरम्यान या टोळीकडून पोलिसांनी पिकअप, लोखंडी पहार, हेक्सपान, लोखंडी पक्कड, मिरची पूड आदी साहित्य जप्त केले आहे.

नेमका या टोळीला दरोडा कुठे टाकायचा होतो हे मात्र अद्याप समजू शकले नाही. परंतु, पोलिसांची वेळीच त्यांचा बंदोबस्त केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार हरिश्चंद्र बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment