राहुरी ;- राहुरीच्या ऊस उत्पादक सभासदांनी मोठ्या विश्वासाने साखर कारखाना आमच्याकडे दिलेला असून गेली दोन वर्षे हा साखर कारखाना चालवत असताना कुणी एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार दाखवून दिला, तर संचालक पदाबरोबरच खासदारकीचा देखील राजीनामा देईल, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या रविवारी आयोजित ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील होते. विखे म्हणाले, कारखान्यातील कर्मचारी तसेच सभासदांचे मोठे सहकार्य लाभल्याने गेली दोन गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत.
यंदा तालुक्यात दीड लाख टन ऊस उपलब्ध असून नेहमीप्रमाणे या उसावर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांची नजर आहे. गळीत हंगामात उसाबाबत मोठी स्पर्धा निर्माण झाली असून त्याला नैसर्गिक परिस्थिती कारणीभूत ठरली. यंदा डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू केला, तर ते अडचणीचे ठरू शकते.
चांगला पाऊस असल्याने पुढील गळितासाठी राहुरीच्या कार्यक्षेत्रात १४ लाख मेट्रीक टन ऊस उपलब्ध राहणार असल्याने पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात गाळप करून डाॅ. तनपुरे कारखान्यास आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
कारखान्यापुढे असंख्य संकटे असल्याने त्यासाठी कारखान्याच्या अतिरिक्त जमिनी विकण्याचा एकमेव पर्याय उरला. या जमिनीचा विक्री केली, तरच तनपुरे कारखाना वाचू शकेल, असे विखे यांनी म्हटले. अध्यक्ष उदयसिंह पाटील म्हणाले, गेल्या गळीत हंगामात तनपुरे कारखान्याने ३ लाख ३६ हजार ११५ मेट्रिक टनाचे गाळप करून ३ लाख ९४ हजार ६०० पोती साखर तयार झाली.
डाॅ. तनपुरे साखर कारखान्याचा उतारा नगर जिल्ह्यातील उत्कृष्ट साखर उतारा असणाऱ्या कारखान्यांपैकी एक ठरला. कारखान्यास जिल्हा बँकेने कर्जाचे पुनर्गठन करून दिल्याने डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू होऊ शकला आहे.
- Plastic Tea Cup : प्लास्टिक कपातून चहा पिणे योग्य आहे का ? वाचा काय आहेत परिणाम ?
- शेवगाव तालुक्यातील १२ गावांमध्ये आनंदोत्सव, शेतकरी सुखावले
- राहुरी तालुक्यात बिबट्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक ! २५० पेक्षा जास्त बिबट्यांचा वावर
- Jal Jeevan Mission :जलजीवन योजनेचे भवितव्य धोक्यात ! राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक अडथळे
- ‘एमआयडीसी’मध्ये उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार – आमदार हेमंत ओगले