महागाईचा भडका! इंधन दरामध्ये पुुन्हा थेंबाथेंबाने वाढ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  कोरोनाचे संकट देशातून हळूहळू कमी होत असल्याने अर्थव्यवस्थेची पुर्वपदावर येण्याकडे वाटचाल सुरु झाली आहे. मात्र त्याचबरोबर दुसरीकडे महागाईची झळ नागरिकांना बसू लागली आहे.

यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत असल्याने आता सामान्य लोकांच्यादृष्टीनेही हा कळीचा विषय झाला आहे.

गेल्या महिनाभरामध्ये पेट्रोलचे भाव लिटरमागे २.३३ रुपयांनी तर, डिझेलचे भाव ३.२६ रुपयांनी वाढले आहेत.शनिवारी (दि. १९) पेट्रोलचा प्रतिलिटर भाव ९०, तर डिझेलचा ७८.९७ रुपये होता.

दरम्यान सध्या कोरोना लशीसंदर्भात सकारात्मक वातावरण असल्याने आर्थिक विकासाच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाच्या मागणीत पुन्हा वाढ झाली आहे.

याचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर पाहायला मिळत आहे. परिणामी भारतात आगामी काळात पेट्रोल शंभरीपार जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उत्पादनानंतर पेट्रोल आणि डिझेलची किंमत फार जास्त नसते.

पण सरकारकडून लावण्यात येणाऱ्या विविध करांमुळे पेट्रोल आणि डिझेल सामान्यांपर्यंत पोहोचेपर्यंत महाग होते. सरकारी धोरणाप्रमाणे इंडियन ऑइल,

भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर आणि परदेशी चलनाचा विनिमय दर विचारात घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. या कंपन्यांना दरनिश्‍चितीचे अधिकार दिलेले असले तरी त्यात केंद्र सरकारची महत्त्वाची भूमिका असते आणि ती नाकारता येत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment