मंत्री गडाखांच्या ताब्यातील या ग्रामपंचायतीची सगळीकडे चर्चा

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. कार्यकर्त्यांसह पुढारी मंडळी निवडणुकीच्या कामात स्वतःला झोकून देत आहे.

त्यातच जिल्ह्यातील काही ठिकाणी निवडणूक या बिनविरोध होत असल्याच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामुळे देखील चांगलीच चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून येत्या बुधवार दि. 23 पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.

गुलाबी थंडीतही तालुक्यातील राजकिय चांगलेच वातावरण तापले आहे. 15 जानेवारीला मतदान होणार असल्याने गुप्त बैठकांना चांगलाच वेग आला आहे

चांदा ग्रामपंचायतीच्या एकूण सतरा जागा असून सद्यस्थितीत ग्रामपंचायत जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख गटाच्या ताब्यात आहे. सर्व जागांचे प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध झाले आहे.

प्रभाग तीनमध्ये दोन उमेदवार वगळता इतर पाच प्रभागांत तीन उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. गावची एकूण मतदार संख्या आठ हजार चारशे अठ्ठाण्णव असून मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा नवीन मतदार वाढले आहेत.