अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेमुळे नगर शहर मतदारसंघात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी माजी आमदार अनिल राठोड यांना सोमवारी पक्षाचा एबी फॉर्म दिल्याने चित्र स्पष्ट झाले.
‘गुलाल घेऊन या आणि कॅबिनेट मंत्रिपद घेऊन जा’, असा शब्दही ठाकरे यांनी त्यांना दिला आहे. त्यामुळे चुरशीची लढत पहायला मिळेल.
राठोड येत्या गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आमदार संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने स्थानिक सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
काहीही झाले, तरी जगताप यांना सेनेत प्रवेश देऊ नये, या मागणीसाठी राठोड यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीचे उंबरठे झिजवले होते.
मात्र, आता राठोड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याने या सर्व राजकीय वावड्यांना खीळ बसली आहे. उध्दव ठाकरे यांनी सोमवारी राठोड यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला.
त्यामुळे नगर शहर मतदारसंघाचे राजकीय चित्र स्पष्ट झाले. मागील निवडणुकीत ऐनवेळी युती तुटल्याने राठोड यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
सेनेकडून राठोड, राष्ट्रवादीचे जगताप, भाजपचे अभय आगरकर व काँग्रेसचे सत्यजित तांबे असे चौघे एकमेकांच्या विरोधात लढले होते.
त्यात सेना-भाजपची युती तुटल्याचा फायदा झाल्याने राष्ट्रवादीचे जगताप निवडून आले होते. आता पुन्हा राठोड व जगताप यांच्यात थेट लढत होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.
शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी राठोड यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे राठोड पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार असून त्यांच्या विरोधात जगताप व अन्य उमेदवार कोणती रणनिती वापरणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
- बिल देण्याच्या कारणावरून साकूरमध्ये हाणामारी ; १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, सकल हिंदू समाजाचे गावबंद आंदोलन
- ‘आध्यात्मिक शक्तीपीठ म्हणून भगवानगडाची ओळख’ ; भगवान गडावर भाविकांची अलोट गर्दी
- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ‘मृत्यूचे तांडव’ सुरूच ! दहा दिवसात अपघातात पाच बळी ; मागणीकडे दुर्लक्ष; नागरिकांचा आक्रमक पवित्रा
- पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला किती पगार असायला हवा? अर्ज करा परंतु त्याआधी अटी वाचा
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा