अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- भाजपचे जामनेरचे आमदार गिरीश महाजन पून्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गिरीश महाजन यांनी पत्नी साधना महाजन
यांच्या नावावर दोन दिवसांपूर्वी 25 कोटी रुपयांची मालमत्ता कवडी मोल किमतीत खरेदी केल्याचा गौप्यस्फोट माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी केला आहे.
यामुळे आता गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान जळगाव शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील (बीएचआर) घोटाळा सध्या चांगलाच गाजतो आहे.
त्यात या घोटाळ्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. मात्र, जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी महाजन यांच्यावर गंभीर आरोप करून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
पारस ललवाणी यांनी जामनेर येथे त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ललवाणी यांनी गिरीश महाजन यांचं थेट नाव घेऊन हे आरोप केले.
ललवाणी यांनी बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहार, जामनेरातील शिक्षण संस्था हडपण्याच्या प्रकरणासह गिरीश महाजन यांनी आपल्या राजकीय विरोधकांवर कशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करून छळ केला याची माहिती दिली.
यावेळी त्यांनी जामनेर नगरपालिकेत अनेक गैरव्यवहार झाल्याचे सांगत गिरीश महाजन यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले. तसेच या पतपेढीच्या अनेक मालमत्ता महाजन आणि त्यांच्या मित्रांनी कवडीमोल भावात घेण्याचा सपाटा लावला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, बीएचआर घोटाळ्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा महाजन यांनी केला आहे. आते या नविन आरोपांबद्दल काय खुलासा करतात याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com