राष्ट्रवादीच्या रक्तदान शिबिरात भाजप नेत्यांची उपस्थिती

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- कोरोना महामारीच्या काळामध्ये सर्वाधिक ताण आरोग्य यंत्रणेवर पडला होता. विशेषत: रक्तपेढ्यांवर मोठे संकट निर्माण झाले होते.

रक्ताच्या तुटवड्यामुळे विविध प्रकारच्या गरजवंत रुग्णांना रक्त मिळणे राज्यात जिकिरीचे होत असल्याने राज्य सरकारने केलेल्या आवाहनानुसार आज होत असलेले

रक्तदान शिबिर हे निश्चितच कौतुकास्पद असून इतरांनी देखील प्रेरणा घेऊन रक्तदान शिबिराचे उपक्रम राबवावेत, असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केले.

राष्ट्रवादीचे नेते सीताराम बोरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी घुले बोलत होते. या शिबिरात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मोठ्या प्रमाणात लावलेली उपस्थिती तालुक्यात राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरत आहे.

राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेले नगरसेवक महेश बोरुडे यांनी देखील या शिबिरात माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या उपस्थितीत रक्तदान केल्याने महेश बोरुडे पुन्हा स्वगृही परतणार का? याबाबत राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.