अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत सोनी मराठी वाहिनीवर सुरु असलेली ‘सावित्रीजोती’ मालिका बंद करण्यात येत असून
महापुरुषांचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने या मालिकेसाठी अर्थसहाय्य देण्यात यावे अशी मागणी अन्न,
नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात श्री.भुजबळ म्हणाले,
महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित दशमी निर्मिती संस्था यांची निर्मिती असलेली ‘सावित्रीजोती’ ही मालिका सोनी मराठी या वाहिनीवर प्रदर्शित होत आहे.
महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे संपूर्ण जीवन व समाजकार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत या मालिकेद्वारे पोहचविले जात आहे. मालिकेचे अद्याप १०० भाग प्रदर्शित होण्याचे बाकी आहेत, असेही श्री.भुजबळ यांनी सांगितले.
महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक सुधारणेच्या कालखंडाबाबतचे भाग प्रदर्शित होणे बाकी आहे.
या महापुरुषांच्या जीवनावरील माहितीपूर्ण भाग प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या मालिकेसाठी राज्य शासनामार्फत अर्थसहाय्य देण्यात यावे अशी मागणी श्री.भुजबळ यांनी केली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved