अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- गेल्या वर्षी स्वच्छता सर्वेक्षणात हागणदारी मुक्तीत देशाच्या पश्चिम विभागात पाचव्या क्रमांकावर बाजी मारणाऱ्या संगमनेर नगरपालिकेने यंदाच्या वर्षासाठी देखील कंबर कसली आहे.
केवळ शहरातील दैनंदिन स्वच्छतेपूरते कार्य न करता आपलं शहर अधिक सुंदर कसं दिसेल या विचारातून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न पालिकेकडून सुरु आहे.
2021 च्या स्वच्छता सर्वेक्षणात दैनंदिन स्वच्छतेसह पालिकेच्या घंटागाड्यांद्वारा दररोज शंभर प्रकारच्या कचर्याचे वर्गीकृत संकलन आणि त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रीयेवर जोर दिला जात आहे.
शहरात दररोज जमा होणार्या शेकडों टन घनकचर्याचे सुयोग्य पद्धतीने वर्गीकरण करुन संगमनेर खुर्दमधील पालिकेच्या कचरा डेपोमध्ये त्यावर प्रक्रीया करुन उत्तम प्रतिचे कंपोस्ट खत तयार केले जाते.
या खताला मोठी मागणी असून त्याद्वारे पालिकेला चांगले उत्पन्नही मिळत आहे. त्यासोबतच याच ठिकाणी पाच टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्पही कार्यान्वीत असून त्याद्वारे वीज निर्मिती केली जात आहे.
प्रक्रीया केंद्रातील संपूर्ण यंत्र व अन्य साधनांसाठी याच वीजेचा वापर केला जात आहे. दरम्यान यावेळी स्वच्छता सर्वेक्षणाबाबत नगराध्यक्षा दुर्गा तांबे म्हणाल्या कि,
नागरिकांच्या संपूर्ण सहकार्याशिवाय ‘स्वच्छ-सुंदर व हरित’ शहराची संकल्पना पूर्ण होवू शकत नसल्याने प्रत्येक संगमनेरकराने या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
त्यासाठी जनजागृतीची मोहिमही सुरु करण्यात आली असून शहरातील अबोल भिंतीही स्वच्छतेचा मंत्र देवू लागल्या आहेत. शहरातील विविध चार ठिकाणी व्हर्टिकल उद्यानांची निर्मिती करण्यात आली असून ‘सेल्फी पॉईंट’ म्हणून संगमनेरकर तेथे गर्दी करीत असल्याचेही दृष्य दिसत आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved