1 हजार 460 किलोमीटरचा पल्ला सायकलवर पाच दिवसात पुर्ण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- दिल्ली ते मुंबईदरम्यान 1 हजार 460 किलोमीटरचा पल्ला असलेले अंतर पाच दिवसात सायकलवर जी-टू-जी सायकल राईड यशस्वीपणे पूर्ण करुन शहरात आलेले नगरचे भूमीपुत्र जस्मितसिंह वधवा यांचा नगरकरांच्या वतीने जल्लोषमय वातावरणात स्वागत करण्यात आले.

चौका-चौकात वधवा यांच्यावर फुलांची उधळण करीत तर गळ्यात फुलांच्या माळा घालून त्यांचे जंगी स्वागत झाले. जी-टू-जी सायकल राईड नगरकरांच्या प्रेरणेने पूर्ण केल्याबद्दल शहरातून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. श्री विशाल गणेश मंदिरात दर्शन करुन व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन शहरातून स्वागत रॅली काढण्यात आली.

जुने बस स्थानक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ आमदार संग्राम जगताप यांनी वधवा यांचे स्वागत केले. वधवा यांच्यासह सहा सायकपटू स्वागत रॅलीत सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन सायकल रॅलीद्वारे सायकल चालवून प्रदुषण थांबविण्याचा व आरोग्य उत्तम ठेवण्याचा संदेश देण्यात आला.

या रॅलीचे मराठा सायकल सेंटर, कापड बाजार असोसिएशन, ईश्‍वर बोरा, नारंग परिवार, लोकसेवा हॉटेल, राजू मदान, आशिष खंडेलवाल, केतन बलदोटा यांच्या स्वागत करुन वधवा यांचा सत्कार केला. शहरातून निघालेल्या सायकल रॅलीचा समारोप पोलीस मुख्यालय येथे झाला.

जी-टू-जी सायकल राईड यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल पोलीस दलाच्या वतीने जस्मितसिंह वधवा यांचा जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सन्मान केला. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक रोशन पंडित, श्रीरामपूरचे विभागीय पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, पोलीस मुख्यालयाचे पो.नि. दशरथ हटकर, जनक आहुजा, देवेंद्रसिंह वधवा, हरजितसिंह वधवा, अतुल डागा, प्रितपालसिंह धुप्पड, प्रदीप पंजाबी, प्रीतम भगवानी उपस्थित होते.

जस्मितसिंह वधवा यांनी जी-टू-जी सायकल राईडच्या माध्यमातून दिल्ली ते मुंबईचा 1 हजार 460 किलोमीटरचा सायकल प्रवास पाच दिवसात पूर्ण केला. यामध्ये रोज 250 किमी 12 ते 18 तास सायकल चालवून हा खडतर प्रवास पुर्ण केला. दिल्लीच्या थंडीतील 0 अंश ते 26 डिग्रीमध्ये हा प्रवास त्यांनी केला.

खडतर रस्ते, उड्डान पूल आदि समस्यांना बाजूला सारत हे यश त्यांनी संपादन केले. यामध्ये संपूर्ण देशातील 43 स्पर्धक तर 4 परदेशी नागरिकांनी सहभाग नोंदवला. संग्राम जगताप यांनी दिल्ली ते मुंबई सायकल राईड पुर्ण करुन वधवा यांनी अहमदनगरचे नांव उंचावले असल्याची भावना व्यक्त करुन, प्रदुषण टाळण्यासाठी व निरोगी आरोग्यासाठी सायकल चालविण्याचा युवकांना आवाहन केले.

पोलीस मुख्यालय येथील समारोपीय कार्यक्रमात हरजितसिंह वधवा व लकी सेठी यांनी जस्मित वधवा यांची खेळात असलेली आवड स्पष्ट करुन त्यांची सायकलिंगची पार्श्‍वभूमी स्पष्ट केली. जस्मितसिंह वधवा यांनी दिल्ली ते मुंबईच्या सायकल राईडसाठी मागील सहा महिन्यापासून तयारी सुरु होती.

कठोर परिश्रम, जिद्द व नगरकरांच्या प्रेमामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे पुर्ण करु शकल्याचे सांगून, पुढील ध्येय काश्मीर ते कन्याकुमारी के टू के सायकल राईडचा संकल्प व्यक्त केला. तर नगरमधून पुढील जी टू जी सायकल राईडसाठी पाच सायकलपटू पाठविण्याचा मानस व्यक्त केला. जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील म्हणाले की, वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याने, देशात अनेक अपघातामध्ये अनेकांचा जीव जात आहे.

मॅरेथॉन व सायकलिंग मधील स्पर्धकांना या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यावर वाहन चालविताना नियमांचे पालन केल्यास अशा स्पर्धकांना खरा सन्मान ठरणार असल्याचे सांगितले. तर आरोग्यासाठी सायकल चालविणे उत्तम असून, पुढील सायकलिंग स्पर्धेसाठी पोलीस दलातील खेळाडू देखील सहभागी होणार असल्याचे सांगितले.

या स्वागत रॅली कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पोलिस दल, तिरंगा फाऊंडेशन, घर घर लंगर सेवा, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, मराठा सायकल सेंटर यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बागुल यांनी केले. प्रास्ताविक धनेश खत्ती यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत हरजितसिंह वधवा यांनी केले.

आभार प्रशांत मुनोत यांनी मानले. यावेळी भूषण कर्नावट, धनेश कोठारी, अनिश आहुजा, हितेश ओबेरॉय, राहुल बजाज, राजा नारंग, मनयोग माखीजा, सनी वधवा, सोनू वधवा, केतन बलदोटा, कैलाश नवलानी, जय रंगलानी, मन्नू कुकरेजा, धनंजय भंडारे, आनंद बोरा, सुधीर लांडगे, डॉ. संजय असणानी, सहेजकुमार वधवा, डॉ.सिमरन वधवा उपस्थित होते.

तसेच लायन्स क्लब प्राईड, सकल राजस्थानी युवा मंच, निरंजन सेवाभावी संस्था, माहेश्‍वरी युवक संघ, बडीसाजन युवक संघ, इंडियन डेंन्टल असोसिएशन, जितो, मिडीया मार्केटिंग असोसिएशन, इंटेरिअर डिझायनर असोसिएशनच्या वतीने जस्मित वधवा यांचा सत्कार करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment