जिल्हा परिषदेत सीईओंच्या ऑफिसबाहेरच तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- शहरातील जिल्हा परिषद कार्यालायात काल एक अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे. झेडपीचे सीईओ यांच्या कार्यालयाबाहेर अभ्यागत कक्षात बसलेल्या एका तरूणाचा बेशुद्ध होऊन अचानक मृत्यू झाला.

निलेश चौधरी (वय 30) असे या मृत तरूणाचे नाव आहे. दरम्यान या घटनेने जिल्हा परिषदे मध्ये एकच खळबळ उडाली होती. याबाबत अधिक माहिती अशी कि, मयत निलेश चौधरी (वय 30) मूळाचा नाशिकच्या भुगूर येथील रहिवाशी आहे.

नगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असताना निलेशची नाशिकला बदली झाली होती. परंतु नगर येथे कार्यरत असताना कार्यालयांतर्गत त्याचे काही प्रलंबित प्रश्न होते.

त्यासंदर्भात त्याने 15 दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची भेटही घेतली होती, अशी माहिती मिळाली.

दरम्यान, बुधवारी (दि.30) सायंकाळी हा तरूण सीईओंच्या अभ्यागत कक्षाबाहेर बसला होता. पाचच्या सुमारास त्याला बसल्याजागीच उलट्या झाल्या व तो खाली कोसळला.

सीईओंच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांनी तातडीने धाव घेत त्याला उचलले व रूग्णवाहिका बोलावून जिल्हा रूग्णालयात हलवले.

परंतु दवाखान्यात नेईपर्यंतच त्याचा मृत्यू झाला होता. मृत्यूचे कारण अद्याप समजले नसून शवविच्छेदनानंतरच कारण स्पष्ट होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी दिली.