शेतकरी आंदोलनात सक्रीय सहभागासाठी अखिल भारतीय किसान सभेचे जत्थे रविवार पासून दिल्लीकडे रवाना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- शेतकरी विरोधी असलेले तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील महिन्याभरापासून दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल घेण्यास केंद्र सरकार तयार नाही.

या आंदोलनासाठी अखिल भारतीय किसान सभेने दिल्ली येथे जाऊन आंदोलनास सक्रीय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी रविवार दि.3 जानेवारी रोजी नागपूर येथून वाहनाचे जत्थे दिल्ली येथील आंदोलनात पाठविण्याची तयारी करण्यात आली असल्याची माहिती कॉ. सुभाष लांडे यांनी दिली.

अहमदनगर जिल्ह्यातून कॉ. लांडे, अ‍ॅड. बन्सी सातपुते, एल.एम. डांगे, बापूराव राशिनकर, आप्पासाहेब वाबळे, भारत अरगडे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण डांगे व सेक्रेटरी कॉ. बन्सी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी नागपूरहून दिल्लीकडे जाणार आहे.

शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा व विविध संघटनांच्या वतीने दिल्ली येथील आंदोलनास पाठिंबा देऊन स्थानिक पातळीवर आंदोलने करण्यात आली होती.

मात्र दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलना बाबतीत केंद्र सरकारची हटवादी भुमिका पहाता हे आंदोलन किती काळ चालणार? हे अनिश्‍चित असून, शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. आता देशातील सर्व राज्यातून या आंदोलनाला पाठिंबा वाढत आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी ही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोहचत असताना अखिल भारतीय किसान सभेने या आंदोलनात सक्रीय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment