अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-नैसर्गिक आपत्ती वगळता पुढील ७२ तासात डॉ.तनपुरे कारखाना सुरळित न चालल्यास मी व माझे सर्व संचालक मंडळ राजीनामा देण्याचा निर्णय घेऊ असा इशारा खासदार सुजय विखे पाटील यांनी दिला आहे.
डॉ.तनपुरे कारखाना कार्यस्थळावर आज सकाळी अधिकारी व कर्मचारी यांची बैठक पार पडली प्रसंगी डॉ.विखे बोलत होते. पुढे बोलताना डॉ.सुजय विखे म्हणाले की, कोट्यावधी रुपये खर्च करूनही डॉ.तनपुरे साखर कारखाना सुरळीत चालत नाही.
नैसर्गिक दोष असता तर तो मान्य केला असता परंतू बॉयलरमध्ये जेव्हा साखर दिसून आली त्यावेळेस मी सुन्न झालो.हा केवळ मानवनिर्मित हलगर्जीपणा असून अशा प्रकारे बॉयलरमध्ये साखर येऊ शकत नाही.
हा कारखाना सुरळीत चालावा असा आमचा आणि सर्व संचालक मंडळाचा प्रामाणिकपणे प्रयत्न होता आणि अजूनही आहे. मात्र हा कारखाना सुरळित चालू नये अशी काही लोकांची मानसिकता असल्याने अशा प्रकारे मानवनिर्मित दोष कारखान्यात आढळून आले आहे.
शेतकरी व सभासद यांचे नुकसान होऊ नये ही माझी प्रामाणिक भावना असून पुढील ७२ तासात नैसर्गिक आपत्ती वगळता डॉ.तनपुरे कारखाना सुरळीत चालू झाला नाही तर पत्रकार परिषद घेऊन मी व माझे सर्व संचालक मंडळ राजीनामा देण्याचा निर्णय घेऊ असा इशारा खा.डॉ.सुजय विखे यांनी दिला आहे.
यावेळी चेअरमन नामदेव ढोकणे, व्हाईस चेअरमन दत्तात्रय ढुस सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आता नजरा कर्डिलेंकडे सुमारे ८-१० कोटी रू.खर्च करूनही
तनपुरे कारखाना मानवनिर्मित संकटामुळे सुरळीत चालत नसल्याने संचालक मंडळाने आता राजीनाम्यापर्यंत पाऊल उचलल्यानंतर सर्वांच्या नजर आता माजी आ. शिवाजी कर्डिले यांच्याकडे लागल्या आहेत.
कारण ‘कारखाना चालवायचा असेल तर आर्थिक मदतीची गरज लागतेच. जिल्हा बँक सध्या कारखान्याला मदत करत नसल्याने यापूर्वी कर्डीले यांच्या माध्यमातूनच जिल्हा बँकेने तनपुरे कारखान्याला मदत केली होती.
आता पुन्हा जिल्हा बँकेची गरज कारखान्याला लागणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजर आता माजी आ. कर्डिले यांच्याकडे लागल्या आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved