‘या’ तालुक्यात आर्सेनिक अल्बमच्या निकृष्ट गोळ्यांचे वितरण

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- कोरोनाच्या प्रभावापासून नागरिकांना वाचविण्याकर्ता ग्रामपंचायतीच्या नागरिकांना वाटप करण्यासाठी देण्यात आलेले रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम गोळ्या

अहमदनगर जिल्हा परिषदच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या शेवगाव तालुक्यात निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने तालुक्यासह जिल्ह्यात सध्या खळबळ उडाली आहे.

होमिओपॅथिक अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या प्रभावी असल्याचे सांगण्यात येत असल्याने ग्रामविकास विभागाने गावागावात या गोळ्यांचे वाटप करण्याचे जाहीर केले.

त्यानुसार नगर जिल्हा परिषदेमार्फतही आर्सेनिक अल्बम गोळ्यांचा पुरवठा गावांना सुरु केला आहे. मात्र शेवगाव तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायत येथे पाठवलेल्या गोळ्यांच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भाजपचे पदाधिकारी उमेश भालसिंग यांनी ग्रामपंचायतीत जावून या गोळ्यांची पाहणी केली असता धक्कादायक बाब समोर आली आहे.

बहुतांश डब्यात गोळ्यांचे पाणी झाल्यासारखं दिसून आलं तसेच हे पाणी घट्ट झाल्याने या गोळ्या सेवन कराव्यात की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यातील सुमन होमिओ फार्मसीने या गोळ्यांचा पुरवठा केला आहे.

गोळ्यांच्या बाटलीवर तसे नमूदही करण्यात आले आहे. या गोळ्यांसाठी जिल्हा परिषदेने वाघोली ग्रामपंचायतीकडून १ लाख ४७ हजार रुपये परत घेतले होते.

भालसिंग यांनी सदर प्रकारावर नाराजी व्यक्त करीत निकृष्ट गोळ्यांचा पुरवठा करणार्‍या पुरवठादार कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.