अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- टाकळीमिया येथील एका लग्नसमारंभात रबडी खाल्ल्याने शंभरावर नागरिकांना रविवारी विषबाधा झाली. सुमारे ३६ जणांना विवेकानंद नर्सिंग होममध्ये, तर २५ जणांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
देवळाली प्रवरा ग्रामीण रुग्णालयात काही रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दोघांची प्रकृती गंभीर आहे. दत्तात्रेय यशवंत काळे व कोल्हार येथील कडस्कर कुटुंबातील लग्न समारंभ टाकळीमियातील वस्तीवर साजरा झाला. सकाळी ११ पासून जेवणावळींना प्रारंभ झाला.
तासाभराने काहींना पोट दुखणे, उलट्या आणि जुलाब होणे, चक्कर येणे अशा तक्रारी सुरू झाल्या.त्यामुळे ही विषबाधा असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यानंतर रुग्णांना तातडीने विवेकानंद नर्सिंग होममध्ये हलवण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास कड यांनी ही अन्नातून विषबाधा असल्याचे सांगितले.
जेवणात दुधापासून बनवलेली रबडी होती. रबडीसाठी भेसळयुक्त दुधाचा वापर झाल्याने विषबाधा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या दिशेने तपास केला जात असल्याचे सांगण्यात आले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved