वाहनधारकांसाठी खुशखबर… FASTag वर मिळणार ‘कॅशबॅक’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-ऑनलाइन व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि वाहनांच्या लांब रांगा कमी करण्यासाठी केंद्रानं FASTag अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच फास्टॅग प्रणालीचा वाहनधारकांनी अधिकाधिक वापर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या अखत्यारीतील यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) पथकर नाक्यांवर फास्टॅगधारक वाहनांना 5 टक्के कॅशबॅक दिलं जाणार आहे.

11 जानेवारी 2021 रोजी या नव्या योजनेला सुरुवात होणार आहे. पथकर नाक्यावरुन जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस व वेगवान होण्यासाठी फास्टॅग प्रणाली विकसित करण्यात आली आहे. फास्टॅग वापरकर्त्या वाहनांची संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहनधारकांसाठी प्रोत्साहनपर कॅशबॅक योजना जाहीर केली आहे.

‘मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व वांद्रे-वरळी सागरी सेतूने प्रवास करणाऱ्या प्रत्येक फेरीला पथकराच्या 5 टक्के कॅशबॅक रक्कम वाहनधारकाच्या फास्टॅग बँक खात्यात महामंडळामार्फत थेट जमा होईल.

फास्टॅगचा वापर वाढावा, या हेतूने महामंडळाने कार, जीप व एसयूव्ही वाहनधारकांकरता मर्यादित कालावधीसाठी सवलत योजना लागू केली आहे,’ असे सह-व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, सातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग, राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) तसेच मुंबई एन्ट्री पॉईंटतर्गंत वाशी, मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), मुलुंड (लाल बहाद्दूर शास्त्री), ऐरोली पथकर नाक्यावर फास्टॅग प्रणाली कार्यान्वित झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment