अहमदनगर करांसाठी आनंदाची बातमी : अहमदनगर मध्ये कोरोना लसीकरणाची ड्राय टेस्टरन यशस्वी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील आज लसीकरणाची सरावफेरी अर्थात ड्राय रन घेण्यात आली. यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात लसीकरण करण्यात येणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना लस कशा प्रकारे देण्यात येणार, याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी महानगरपालिकेच्या तोफखाना नागरी आरोग्य केंद्र येथे प्रत्यक्ष भेट देऊन याची पाहणी केली तर ग्रामीण भागात वाळकी ग्रामीण आरोग्य केंद्र येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी पाहणी केली. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने लसीकरणाची ही सराव फेरी यशस्वीपणे पूर्ण केली असून लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी दिली.

आज संपूर्ण राज्यात कोरोना लसीकरणासाठी सरावफेरी घेण्यात आली. त्यासंदर्भात राज्य शासन आणि आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात महानगरपालिका आणि ग्रामीण भागात या लसीकरण मोहिमेचे प्रात्यक्षिक झाले. आज सकाळीच जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी महानगरपालिकेच्या तोफखाना नागरी आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील लसीकरण सरावफेरीची पाहणी केली.

निवड केलेले लाभार्थी, त्यांची नोंद, त्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया, त्याचे कोविन अॅपवर नोंदणी, लसीकरण झाल्यानंतर लाभार्थ्यांला पहिले लसीकरण झाल्याबाबत त्याच्या मोबाईलवर आलेला संदेश ही सर्व प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्वत: पाहिली. तेथील नियोजनाबाबत काही सूचनाही दिल्या. संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील वाळकी (ता. नगर) येथे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. क्षीरसागर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी भेट दिली. तेथील लसीकरण मोहिम सरावफेरीसंदर्भात केलेली तयारी आणि प्रत्यक्ष सरावफेरी त्यांनी पाहिली.

ग्रामीण भागातही लसीकरणासंदर्भात सर्व तयारी पूर्ण झाली असून या सरावफेरीमुळे आरोग्य कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष लसीकरणावेळी काय करावे लागणार आहे, याची पूर्ण माहिती मिळाली आहे. त्यामुळे या मोहिमेसाठी आता सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली. तोफखाना नागरी आरोग्य केंद्र येथे महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना माहिती दिली.

कार्यक्रम अधिकारी डॉ. नलिनी थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका गोरे, डॉ. सुजीत सैंदाणे, मंगला माटे, प्रतिमा राऊत, पूनम सूर्यवंशी, निर्मला गायकवाड, अलका कोलवते, अन्सारी ईबारतुनिसा, राहील प्रभुणेस इम्रान सय्यद अमोल गुजर, सोनाली कर्पे, योगेश गडाख, विकास गीते, द्वारका साठे आदींनी या लसीकरण मोहिमेसंदर्भातील सरावफेरीदरम्यान विविध कामांचे संयोजन केले.

वाळकी ग्रामीण आरोग्य केंद्रात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सरावफेरी तयारी आणि प्रात्यक्षिक पार पडले. डॉ. अनिल ससाणे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही जबाबदारी पार पाडली. अतिशय काटेकोरपणे आरोग्य विभागाने दिलेले निर्देश आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करत हा ड्राय रन पार पडला.

….अशी पार पडली लसीकरणाची सरावफेरी!

या लसीकरण सरावफेरीसाठी प्रत्येक केंद्रावर २५ लाभार्थी आरोग्य कर्मचार्‍यांची निवड करण्यात आली होती. आरोग्य केंद्रात आल्यानंतर त्यांची ओळख पटवणे, त्यांच्या शरीराचे तापमान मोजणे आणि ऑक्सीजन प्रमाण तपासणे, त्यानंतर त्यांची नोंद केली जात होती. त्यानंतर त्यांना प्रतीक्षा कक्षात बसवले जात होते.

तेथून त्यांना लसीकरणासाठी असलेल्या कक्षात नेले जात होते. तेथे कोविन अॅपवर त्यांनी दिलेल्या माहितीची खातरजमा झाल्यानंतर त्यांना लसीकरण दिले जात होते. तेथे असणारे आरोग्य कर्मचारी त्यांना कोविड च्या लसीकरणानंतर काय काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन करत होते. त्यानंतर लसीकरण झाल्यावर किमान अर्धा तास त्यांना विश्रांती कक्षात थांबवले जात होते तसेच त्यांना काही त्रास होत नाही ना याची विचारपूस केली जात होती.

याचदरम्यान, संबंधितांना लसीकरण झाल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर लसीकरणाचा पहिला डोस झाल्याचा संदेश प्राप्त होत होता. या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी सुसज्ज रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली होती. अशाप्रकारे लसीकरणाची ही सरावफेरी अर्थात ड्राय रन पार पडले. त्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणेने अतिशय काटेकोर नियोजन केले आणि मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment