सत्य नेहमी कडू असते पण ते सत्यच असते साहेब…

Ahmednagarlive24
Published:

तालुक्यातील लोकांनी पदरमोड करून, उपाशी राहून, बायकोचे मंगळसूत्र मोडून कारखाना उभा करायला पैसे दिले होते. कारखाना हा तालुक्यातील लोकांच्या घामाच्या पैशावर उभा राहिलेला आहे, त्यासाठी साहेबांनी आपल्या घरातून कीती पैसे दिले याचा हिशोब आहे का.?

कसा असणार, कारण अनेक शेतकऱ्यांनी आपल्या काळजाचा तुकडा असलेले बैल विकून कारखान्यासाठी पैसे दिले होते पण साहेबांचा एक शिंगाचा का होईना तो बैल घरीच होता.

आम्ही हजारो कर्मचाऱ्यांच्या घरच्या चुली चालवतो म्हणे. पण कारखाना आला म्हणजे कर्मचारी आलेच त्यात जगावेगळं असे काय आहे.? आणि कर्मचाऱ्यांना काय साहेब आणि त्यांचा कारखाना फुकट पगार देतो की काय.?

सकाळी 9 ते 6 पर्यंत तो बिचारा कर्मचारी कारखाना व संस्थेत राबतो. त्याच्या घामाचे मोल म्हणून त्याला पगार मिळतो. त्या पगारातुनही तुमच्या सोहळे आणि वाढदिवसाला पैसे कापले जातात.

वरतुन कर्मचाऱ्यांना पगार देऊन त्यांचे घर चालवतो ही उपकाराची भाषा बोलताना साहेबांच्या मुलांना जराही शरम वाटू नये.

साहेबांनी शेतकऱ्यांचा पैसा वापरुन कारखाना उभा केला, उसाच्या पेमेंटमधून पैसे कापून संस्था उभा राहिल्या. जिथे डोनेशन शिवाय शेतकऱ्यांच्या मुलाला ऍडमिशन मिळत नाही.

याच कारखाना व संस्थेच्या माध्यमातून घोटाळे करून साहेबांनी आपले खाजगी व्यवसाय उभे केले, देशात आणि परदेशात मालमत्ता घेतल्या,

चहाचे मळे विकत घेतले, दारूची फॅक्टरी टाकली, जावयाला व्यवसाय टाकून दिले आणि हजारो कोटींची खाजगी संपत्ती स्वतःच्या कुटुंबाच्या नावाने गोळा केली.

आज साहेब, साहेबांची मुले, साहेबांच्या सुना, साहेबांचे नातू हे सगळे आलिशान आणि करोडो रुपयांच्या महागड्या गाडीत फिरतात.

त्या गाड्यांमधील डिझेल देखील कारखान्याच्या पेट्रोल पंपातून टाकले जाते, ज्याचे पैसे शेतकऱ्यांना उसाच्या बिलातून द्यावे लागते.

मात्र दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी अक्षरशः आपल्या बायकोच्या गळ्यातले मंगळसूत्र विकून कारखाना उभा केला त्या शेतकऱ्यांच्या वाटेला आज काय आहे.?

त्या शेतकऱ्याचा ऊस कारखान्यात येतो तेव्हा त्याचा काटा मारला जातो, अनेकांकडे आज देखील साधी मोटारसायकल सुद्धा नाही, ज्यांच्याकडे आहे त्यापैकी अनेकजण आजही स्वतः च्या गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी महाग आहेत. 

पण साहेब तुमचे कुटुंब मात्र ऐषोआरामात आहे. ते आंबोली, कुलू मनाली, पंजाबला मस्त मजेत फिरायला जातात. महागडे कपडे, महागड्या गाड्या वापरतात, भारी फोन वापरतात. फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये पार्टी करतात.

मग एक प्रश्नाचे उत्तर द्या साहेब, कारखाना उभा करून तालुक्यातील शेतकऱ्यांनी तुमच्यावर उपकार केले की तुम्ही तालुक्यातील शेतकऱ्यांवर उपकार केले.?

सत्य नेहमी कडू असते पण ते सत्यच असते साहेब..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment