उस्मानाबाद- पत्नीसोबत मुलाचे अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून बापानेच स्वतःच्या मुलाचा चाकूने वार करून ठार केले. ही धक्कादायक घटना उस्मानाबाद जिल्ह्यात घडली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पावसात पाठलाग करून आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावात ६५ वर्षीय व्यक्तीने त्यांच्या ३५ वर्षीय मुलावर आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन शुक्रवारी (दि. ४) सायंकाळी घरात मुलगा पाणी पित असताना सून व स्वतःच्या पत्नीसमोर चाकूने भोसकून वार केले.
यात मुलगा गंभीर जखमी झाला. दरम्यान, जखमी मुलाला नातेवाइकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी मृत मुलाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी पळून जात असताना सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, मुख्य अंमलदार ज्ञानेश्वर पोफलायत, शिवाजी गवळी, बाबासाहेब मोराळे, लक्ष्मण सगर यांनी शनिवारी पहाटे ३ वाजता पाठलाग करून अटक केली. दरम्यान, न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे करत आहेत.