कचऱ्याच्या समस्याने नागरिक झाले हैराण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- नागरदेवळा येथे अनधिकृत कामे केली जातात. या प्रभागाला स्वत:चा कचरा डेपो नसल्याने सर्वत्र कचर्‍याची समस्या आहे. तो जागेवरच पेटून दिला जात असल्याने धुराचे साम्राज्य निर्माण होते.

तसेच कचर्‍यामुळे दुर्गंधीही येते. यामुळे नागरदेवळा आणि आलमगीर भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. घंटागाडी कचरा उचलण्यासाठी येत नसल्याने नागरिकांना दुर्गंधीत दिवस काढण्याची वेळ आली आहे. यामुळे संसर्गजन्य रोग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मोकाट जनावरे कचर्‍यातील प्लास्टिक पिशव्या खात असल्याने त्यांचाही जीव धोक्यात आला आहे. नागरदेवळा ग्रामपंचातय हद्दीत अनेक वर्षांपासून कचर्‍याची समस्या आहे. ही समस्या सुटण्यासाठी प्रयत्नही होत नाहीत. वरिष्ठही याकडे दुर्लक्ष करतात. आमदार संग्राम जगताप यांनी भिंगार कचरा डेपो येथे डम्पिंग करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.

नागरदेवळा ग्रामपंचायतला स्वमालकीची जागा नसल्याने कचरा डम्पिंग कुठे करावे, असा प्रश्‍न आहे. जिल्हाधिकार्‍यांचेही याकडे लक्ष वेधण्यात आलेले आहे. वेळोवेळी निवेदन दिले आहे. हा प्रश्‍न वेळीच सुटला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य फारुख पठाण यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment