विरोधी पक्षांचे राजकीय दिवाळे निघाले !

Ahmednagarlive24
Published:

नवी दिल्ली : ‘विरोधी पक्षांचे राजकीय दिवाळे निघाले आहे. त्यांच्याकडे नरेंद्र मोदी सरकारवर टीका करण्यासाठी कोणतेच मुद्दे शिल्लक नाहीत’, अशा तिखट शब्दांत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी विरोधकांची, सरकार राजकीय सूड उगवत असल्याची टीका फेटाळून लावली.

केंद्र सरकारविरोधी पक्षांच्या नेत्यांवर राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप काँग्रेस व अन्य राजकीय पक्षांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. ‘सरकारने नव्हे, तर न्यायालयांनी काही नेत्यांना तुरुंगात पाठवले आहे. त्यामुळे ही निव्वळ निराधार व बोगस टीका आहे. सरकारवर कोणताही आरोप नाही. विरोधकांचे पूर्णत: दिवाळे निघाले आहे’, असे ते म्हणाले.

‘जामीन देण्याचे काम सरकारचे नव्हे तर न्यायालयाचे आहे. सरकारचा त्यात कोणताही हस्तक्षेप नसतो’, असेही ते यावेळी म्हणाले. ‘न्यायालयांनी नेत्यांचा जामीन फेटाळला आहे. कारण, त्यांना त्यांच्याविरोधात सकृतदर्शनी पुरावे आढळले आहेत. एखादा व्यक्ती तपास व साक्षीदारांना प्रभावित करण्याचा संशय असेल तर न्यायालय त्याला तुरुंगात ठेवण्यास प्राधान्य देते’, असे ते यावेळी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीवर भाष्य करताना म्हणाले.

केंद्र सरकार व भाजप २४ तास जनतेसाठी काम करत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. ‘पक्ष व सरकार जनतेसाठी २४ तास काम करत आहे. यामुळेच मला गत ५ वर्षांतील सरकारच्या अनेक यशांचा पाढा वाचता येईल. विरोधकांना काम करण्यापासून कुणीच रोखले नाही’, असे ते म्हणाले. यावेळी त्यांना देशाची एकपक्षीय पद्धतीकडे वाटचाल सुरू आहे काय? असा प्रश्न केला असता त्यांनी हा विरोधकांचा अपप्रचार असल्याचे स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment