अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- केंद्र सरकारचे हे काळे कृषी कायदे महाराष्ट्रात लागू केले जाणार नाहीत ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. एकीकडे शेतकरी, कामगार उद्ध्वस्त होत असताना दुसरीकडे इंधन दरवाढ करून सामान्य जनतेलाही लूट सुरु आहे.
कृषी कायदे रद्द करावेत आणि पेट्रोल- डिझेलची दरवाढ त्वरीत मागे घ्यावी या मागणीसाठी १६ जानेवारी रोजी नागपूर येथे आंदोलन केले जाणार आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी संघर्ष करत आहेत.
हे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर जवळपास मागील ४५ दिवसांपासून लाखो शेतकरी हाडं गोठवणाऱ्या थंडीत ठाण मांडून बसलेत. या आंदोलनात आतापर्यंत ६० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला असून केंद्रातील असंवेदनशील सरकारला अजून जाग आलेली नाही.
या निर्दयी, अहंकारी मोदी सरकारला जागे करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते १६ जानेवारीला नागपूर येथील ‘राजभवनला घेराव’ घालणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. केंद्रातील मोदी सरकार निवडक उद्योगपतींच्या हितासाठी काम करत असून या सरकारला देशातील गोरगरीब जनता शेतकरी, कामगार यांचे काही देणे घेणे नाही.
केंद्र सरकारने संसदेच्या नियमांना पायदळी तुडवून आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे आहेत. भांडवलदारांच्या हिताचे हे कायदे तात्काळ रद्द करावेत ही शेतकऱ्यांची भूमिका योग्य असून काँग्रेस पक्षाने वारंवार शेतकऱ्यांना पाठिंबा देत विविध आंदोलनाच्या माध्यमातून निर्दयी केंद्र सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved