राहाता : शहरालगत भरलोकवस्तीत घुसून बिबट्याने शेळीचा फडशा पाडल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास कार्ले वस्तीवर घडल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी गणेश कारखान्याचे अध्यक्ष नारायणराव कार्ले यांनी केली आहे.
बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास कार्ले वस्तीवर अरुण बाबुराव कार्ले यांच्या गोठ्यात घुसून शेळी ओढून नेत असताना कुत्रे का भूंकतात म्हणून घरातील लोक बाहेर आले, तर समोर बिबट्या शेळीला ओढताना दिसून आला. यावेळी अनेकांनी आरडाओरड केली व फटाके वाजवून बिबट्याला पळवून लावले. मात्र तोपर्यंत बिबट्याने शेळीचा जीव घेऊन पलायन केले.
या प्रकाराने संपूर्ण कार्ले वस्तीवरील लोकांनी शेकोट्या पेटवून रात्र जागून काढली.. गेल्या चार-पाच वर्षापासून राहाता, अस्तगाव, एकरुखे परिसरात बिबट्याचा वावर आहे. आतापर्यंत चार ते पाच बिबटे वनविभागाने पकडलेही. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा या परिसरात बिबट्याने अनेक शेळ्या व पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला आहे.
तो आता थेट लोकवस्तीतही घुसू लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात चिकू व पेरूच्या बागांमध्ये लपण्यासाठी जागा असल्याने त्याचा मुक्काम याच परिसरात आहे. त्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.