मृतावस्थेत सापडलेल्या ‘त्या’ कावळ्याचा रिपोर्ट धक्कादायक

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-कोरोनानंतर आता नगरकरांवर बर्ड फ्लूचे संकट घोंगावत आहे. भानगाव (ता. श्रीगोंदा) येथील कावळ्याचा बर्ड फ्ल्यूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

यामुळे पशुसंवर्धन विभाग खबरदारी म्हणून एक किलो मीटरचा भाग सॉनिटाईज करणार आहे. यासह परिसरातील पोल्ट्री फार्म, कोंबडयाचे खूराडे निजुर्ंतिकीकरण करणार असल्याचे जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, नगरजवळ 151 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. या कोंबड्यांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पुण्यात पाठविले असल्याची माहिती पशू संवर्धन विभागाने दिली.

देशातील काही राज्यांमध्ये बर्ड फ्लू सारख्या आजाराने थैमान घातलेले असतांना, महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये याचा प्रादुर्भाव पाहण्यास मिळत आहे.

मात्र, श्रीगोंदयात पक्षी मृतावस्थेत आढळल्याने, सामान्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यानंतर याबाबतचा अहवाल काल दिनांक १५ जानेवारी रोजी उपलब्ध झाला.

भानगाव मध्ये ज्या ठिकाणी कावळा मृतावस्थेत आढळला, त्या परिसरासह आसपास कोंबड्यांची खुराडी व पोल्ट्री फार्म तसेच जवळच्या कार्यक्षेत्रामध्ये सोडियम हैपो क्लोराईडची फवारणी करण्यात येत असल्याचे डॉ. वसमतकर यांनी सांगितले आहे. संक्रमित पक्ष्यांच्या प्रवासातून हा प्रादुर्भाव पक्षांत वाढत जातो असेही त्यांनी सांगितले