अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-माटुंगा येथे ऑनर किलिंगचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. भावाने बहिणीच्या दिव्यांग पतीची चाकू भोसकून हत्या केली आहे.
पती दिव्यांग असल्याने त्यांच्या प्रेमविवाहास मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. या प्रकरणी शाहू नगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. माटुंगा लेबर कॅम्पमध्ये अमन सिकंदर शेख (१९) हा कुटुंबासह राहतो.
त्याची बहीण लाना (२०) हिचे शेजारच्या अक्रम युसुफ चौधरी ऊर्फ बाबू (२६) याच्याशी प्रेमसंबंध होते. अक्रम दिव्यांग होता. त्यामुळे लानाच्या कुटुंबाला तो पसंत नव्हता.
अक्रमने गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लानाला पळवून तिच्याशी प्रेमविवाह केला. त्यामुळे लानाचे कुटुंबीय अक्रमवर नाराज होते. त्यातूनच लानाचा भाऊ अमनने अक्रमला संपवण्याचा कट रचला.
तो त्यासाठी सतत प्रयत्नात होता. गुरुवारी रात्री १०च्या दरम्यान अक्रम घरातील किराणा सामान आणण्यासाठी बाजारात जात होता. त्याचवेळी माटुंगा येथील रतन महल इमारतीजवळ अमन आणि त्याचा मित्र एझाजबरोबर बसला होता.
त्याने अक्रमला पाहताच पोटात चाकू भोसकून गंभीर जखमी केले. नंतर तेथून मित्रासह पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अक्रमला स्थानिकांनी सायन रुग्णालयात उपचारासाठी हलवले.
मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अमनचा मित्र एझाज याला अटक केली. मात्र, अमन अद्याप फरार आहे. अमनने अक्रमला लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच संपवण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात आले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved