‘ह्या’ दिवशी शरद पवार असणार अहमदनगर जिल्ह्यात मुक्कामी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-अकोल्याचे माजी आमदार यशवंतराव सखाराम भांगरे यांच्या ३९ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने भंडारदरा (शेंडी) येथे रविवारी (२४ जानेवारी) दुपारी ३.३० वाजता देशाचे माजी संरक्षण व कृषिमंत्री खासदार शरद पवार हे अशोक भांगरे यांच्या घरी येणार आहेत. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भंडारदऱ्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार यशवंतराव भांगरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. येत्या रविवारी सकाळी नगर येथील एका खासगी रुग्णालयाचे उद्घाटन करून दुपारी ३ वाजता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व इतर मंत्र्यांसह त्यांच्या हेलिकॉप्टरचे भंडारदरा धरण परिसरातील मुरशेत येथील हेलिपॅडवर आगमन होईल. यावेळी आदिवासींचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे, युवा उद्योजक अमित भांगरे, आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके त्यांचे स्वागत करतील. शेंडी येथे आयोजित मुख्य कार्यक्रमास ते मार्गदर्शन करणार आहेत.

अध्यक्षस्थान राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील भूषवणार आहेत. या कार्यक्रमानंतर शरद पवार हे भंडारदरा येथील हॉटेल यश रिसॉर्टवर मुक्काम करणार आहेत. ते सोमवारी पहाटे भंडारदरा धरण परिसरातील निसर्गाचा अनुभव घेत सकाळी हेलीकॉप्टरने मुंंबईकडे मार्गस्थ होणार आहेत. या दरम्यान ते रिसॉर्टवर अकोले तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित व महत्त्वपूर्ण प्रश्न सोडवण्याबाबत राष्ट्रवादीतील राजकीय नेतृत्वांसह उपस्थित कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करणार आहेत.

पुण्यतिथी कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जलसंधारण मंत्री शंकर गडाख, आदिवासी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, खासदार हेमंत गोडसे, खासदार राजेंद्र गावीत उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, कोपरगावचे आमदार अशुतोष काळे,

माजी आमदार अरुण जगताप, नगरचे आमदार संग्राम जगताप, विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार नीलेश लंके, माजी आमदार माणिक कोकाटे, विठ्ठलबापू खाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,

जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील पवार, ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, मारुती मेंगाळ, शरद कोंढार यांच्याबरोबरच महाविकास आघाडीतील पक्षांचे मातब्बर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment