श्रीगोंद्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल ! अनेक दिग्गजांचे पराभव..

Ahmednagarlive24
Published:

हमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक यांच्या पत्नी सुनीता महाडिक, तसेच माजी जि. प. सदस्य व कुकडी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अनिल वीर यांचा आमदार बबनराव पाचपुते समर्थक सतीश धावडे यांच्या पॅनेलने दारुण पराभव केला.

चांडगाव येथील भाजपचे पं. स. माजी सदस्य राजेंद्र म्हस्के यांच्या पॅनेलला अवघी १ जागा मिळाली. राजापूर ग्रामपंचायतीत विद्यमान सभापती गीतांजली पाडळे यांचे पती शंकर पाडळे यांनी बाजी मारली. नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर यांच्या पॅनेलने यश मिळवले. ५९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ ला झाली.

वांगदरी ग्रामपंचायत निवडणूक भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी प्रतिष्ठेची केली होती. मात्र, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष आदेश नागवडे यांनी त्यांचा १०० मतांनी पराभव केला.

वडघुल ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक यांची पत्नी सुनीता महाडिक यांचा चांगुणा कळमकर यांनी १२२ मतांनी पराभव केला. येळपणे ग्रामपंचायतीत जि. प. चे माजी सदस्य अनिल वीर यांचा पाचपुतेंचे समर्थक सतीश धावडे व जितू धावडे यांच्या नेतृत्वाखाली मानसिंग ठाणगे यांनी पराभव केला.

चाडगाव येथे भाजपचे राजेंद्र म्हस्के यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत त्यांच्या पॅनेलला अवघ्या १ जागेवर समाधान मानावे लागले. टाकळी कडेवळीतमध्ये नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब इथापे व सुदाम नवले यांनी सत्ता परिवर्तन केले. आढळगावात आमदार पाचपुते यांचे कट्टर समर्थक उत्तम राऊत पॅनेलला ६ जागा मिळवत सत्तेच्या जवळ गेले.

माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांच्या पॅनेलमध्ये पत्नी व मुलगा निवडणूक रिंगणात उभे होते. ठवाळ यांचा मुलगा श्रीकांत यांचा पराभव झाला, तर पत्नी अनुराधा विजयी झाल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment