‘त्या’ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, पोलिसांनी दिला काठीचा प्रसाद

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींची मतमोजणी प्रक्रिया नुकतीच पार पडली. यात पराभूत उमेदवार नाराज झाले, तर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

गणेगाव येथे डी.जे. लावून मिरवणूक काढण्यात आली होती. पोलिसांनी मज्जाव केला; परंतु कोणीही ऐकत नसल्याचे पाहून दिसेल त्याला काठीचा प्रसाद दिला. त्याचबरोबर वांबोरी येथे मिरवणूक काढल्याच्या कारणावरून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

राहुरी तालुक्यातील गणेगाव येथे कर्डिले गटाने तनपुरे गटावर मात करून नऊ जागांवर विजय मिळवला. संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास कर्डिले गटाने डी.जे. लावून मिरवणूक काढली. यावेळी जेसीबीवरून गुलालाची उधळण करण्यात आली. उमेदवारांसह कार्यकर्ते डीजेच्या तालावर नाचण्यात दंग झाले होते. त्यावेळी पोलिसांनी मिरवणूक काढण्यास व डीजे वाजवण्यास मज्जाव केला; परंतु कोणी ऐकत नव्हते.

अखेर पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना माहिती दिली. त्यांनी ही बाब पोलीस अधीक्षकांच्या कानावर घातली. दंगल नियंत्रक पथकातील एक उपनिरीक्षक व २७ जवाणांचे पथक वाहनांतून गणेगावात दाखल झाले.

त्यांनी थेट मिरवणुकीवर हल्लाबोल केला. दिसेल त्याला काठीने चोपून काढले. नाचणारे सर्वजण सैरावैरा पळत सुटले. काहीजण घरात तर काहीजण उसात लपून बसले होते. त्या ठिकाणाहून ज्याच्या अंगावर गुलाल दिसेल त्याला बाहेर काढून चोप दिला.