अण्णा हजारे यांच्या आंदोलनात भारतीय देशभक्त पार्टी उतरणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी अण्णा हजारे यांनी दि.30 जानेवारी पासून आंदोलन करण्याची घोषणा केली असून, या आंदोलनास भारतीय देशभक्त पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी असलेल्या या आंदोलनात देशभक्त पार्टी सक्रीयपणे उतरणार असून, या संदर्भात अण्णा हजारे यांना पत्र पाठविण्यात आले असल्याची माहिती देशभक्त पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी वायू सैनिक अ‍ॅड. शिवाजी डमाळे यांनी दिली आहे. माजी सैनिक व देशभक्तांनी एकत्र येऊन सदर राजकीय पार्टीची स्थापन केली आहे.

भारतीय देशभक्त पार्टीने राजकारणातील घराणेशाही व प्रस्थापितांविरोधात बंड केला असून, मागील अनेक वर्षापासून संघटनेच्या वतीने बौध्दिक चळवळ सुरु आहे. अण्णा हजारे यांच्या दिल्ली येथे लोकपालच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनास व राळेगणसिध्दी येथे झालेल्या आंदोलनात देखील पाठिंबा देऊन सक्रीय सहभाग घेतला होता.

अण्णांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर पुकारलेल्या या जन आंदोलनास देशभक्त पार्टी उतरणार असून, दिल्ली येथून पार्टीचे अध्यक्ष माजी कर्नल परमार, कॅप्टन अरुण कदम, अ‍ॅड.योगेश जोशी यांनी देखील या आंदोलनास पाठिंबा दर्शविला असल्याचे अण्णांना पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे.

राजकारणातील बहुतेक राजकीय पक्षात अनेक गुंड व भ्रष्टाचारी प्रवृत्ती असल्याने जनहिताच्या प्रश्‍नासाठी प्रत्येक वेळी आंदोलन व संघर्ष करावा लागत आहे. सज्जन व निष्कलंक व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्याकरिता व राजकारणातील स्वच्छता होण्यासाठी पार्टी प्रयत्नशील आहे.

चांगले व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यास जनहिताच्या मागणीसाठी नेहमीच संघर्ष करावा लागणार नसल्याचे अ‍ॅड. शिवाजी डमाळे यांनी म्हंटले आहे. तर शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीचा समावेश असलेला कायदा आनण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे पार्टीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment