अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- गेल्या महिन्यातच साई मंदिर खुले झाले असले तरी कोविडचा धोका अद्याप संपलेला नाही. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलिसांना शिर्डीतील भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलीस, नगरपंचायत व साई संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने शनिवारी ३३ पुरुष व १२ महिला भिक्षेकऱ्यांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/03/Police.jpg)
या सर्वांना राहाता न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दरम्यान कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते.
मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. आता साईंच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला असल्याने भाविकांच्या वर्दळीच्या ठिकाणी व मंदिर परिसरालगत हे भिक्षेकरी भाविकांच्या आसपास घोटाळून, केविलवाणे तोंड करून भिक्षा मागत असतात.
अनेकदा भाविक जोपर्यंत भिक्षा देत नाही तोपर्यंत ते त्याचा पिच्छा सोडत नाहीत. यातील काही भिक्षेकरी नशेतही असतात. या अशा एकुण ४५ भिक्षेकऱ्यांवर कारवाई करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या भिक्षेकऱ्यांपैकी पुरुष भिक्षेकऱ्यांची रवानगी विसापूर, तालुका श्रीगोंदा तर महिला भिक्षेकऱ्यांची रवानगी चेंबूर, मुंबई येथे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सायंकाळी पोलीस पथके या भिक्षेकऱ्यांना घेऊन रवाना झाल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved