पुण्यातील त्या मुलीच्या अपहरण प्रकरणाला नाट्यमय वळण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-पिस्तुलाच्या धाकाने तरुणीचे भर दिवसा अपहरण केल्याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाला आता नाट्यमय वळण मिळाले आहे.

अपहरण झालेल्या तरुणीने स्वतः न्यायालयात हजर राहून शपथपत्र सादर केले आहे. त्यात ते अपहरण नसून मी माझ्या मर्जीने तरुणासोबत गेले असल्याचे म्हटले आहे. याबाबत तरुणीच्या वडिलांनी चिंचवड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १९ ) फिर्याद दिली आहे.

मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास एका कार्यालयात घुसून शंतनू चिंचवडे (रा. पडपळ आळी, चिंचवड) नावाच्या तरुणाने 23 वर्षीय तरुणीचे पिस्तुलाच्या धाकाने अपहरण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील बाहेर आला होता.

तरुणीसोबत मैत्रीचे संबंध असून तरुणी शंतनुला टाळत असल्याने त्याने हे अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यानंतर पोलिसांनी शंतनुला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, त्यावेळी त्या तरुणीने चक्क न्यायालयात येऊन स्वतः शपथपत्र दिले.

त्यात तिने म्हटले आहे की, हे अपहरण नसून मी माझ्या मर्जीने त्या तरुणासोबत गेले. तरुणासोबत आपले प्रेमसंबंध असून त्याला तरुणीच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे तिने तरुणाला ऑफिसमध्ये बोलावून घेत त्याच्यासोबत गेली असल्याचेही शपथपत्रात म्हटले आहे.

अशी माहिती ऍड. अतिश लांडगे यांनी दिली. या शपथपत्रामुळे या अपहरण प्रकरणाला नाट्यमय वळण लागले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीने जबरदस्ती केल्याचे दिसत असतानाही तरुणीने घेतलेल्या भूमिकेमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment