अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बुधवारी झालेल्या सुनावणीत राज्य शासनाच्या वकिलांनी आमची तयारी झालेली नाही, असे कुठेही म्हटले नाही.
जे सर्वोच्च न्यायालयात बोललेच गेले नाही, जे घडलेच नाही, ते सांगून महाराष्ट्राची दिशाभूल करणाऱ्या खोटारडे आमदार विनायक मेटेंनी माफी मागावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
मेटेंनी गुरूवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात राज्य शासनाच्या वकिलांनी सुनावणीकरिता आमची तयारी नसल्याचे सांगितल्याचा आरोप केला आहे. हा आरोप धादांत खोटा असल्याचे सांगून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी मेटेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने त्याची सुनावणी ऑनलाईन ऐवजी प्रत्यक्ष घ्यावी, अशी विनंती राज्य शासनाच्या वकिलांनी केली होती.
या प्रकरणाची सुनावणी प्रत्यक्ष रूपात घ्यावी, ही केवळ राज्य शासनाची भूमिका नसून, यापूर्वी झालेल्या अनेक व्हीडीओ कॉन्फरन्सेसमध्ये मराठा समन्वयक आणि वकिलांनी देखील ही भूमिका मांडली होती.
तीच भूमिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवली आहे. परंतु, आ. विनायक मेटे यांचे मराठा आरक्षणातील स्वारस्य केवळ राजकारण करण्यापुरते आणि भाजपच्या आपल्या बोलवित्या धन्यांना खुष करण्यापुरताच असल्याने ते सतत धादांत खोटी, चुकीची, विसंगत, विपर्यास करणारी विधाने करीत असतात.
महाराष्ट्राच्या इतिहासात असा महाखोटारडा नेता झाला नसेल. मराठा आरक्षणाबाबत त्यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगवेगळे आहेत. त्यांचा हेतू शुद्ध नाही, हे देखील स्पष्ट होऊ लागले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved