अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- विडी उत्पादन करीत असलेल्या साबळे वाघीरे आणि कंपनीने संभाजी विडीचे नामांतर साबळे विडी केले असून, या विडीच्या नवीन नावाच्या पॅकिंगचे अनावरण नुकतेच केडगाव रोड, रेल्वे स्टेशन येथील कंपनीच्या आवारात करण्यात आले.
यावेळी कंपनीचे व्यवस्थापक बाबू शांतय्या स्वामी, लाल बावटा विडी कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी अॅड.कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष भारती न्यालपेल्ली, इंटकचे शंकरराव मंगलारप, विनायक मच्चा आदींसह कामगार उपस्थित होते.
1932 पासून साबळे वाघीरे आणि कंपनी विडी उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहे. 1958 पासून कंपनीने संभाजी विडी नावाने उत्पादन सुरु केले होते. मात्र काही कारणास्तव 24 डिसेंबर 2020 पासून संभाजी विडीचे नांवात बदल करण्यात आला आहे. अहमदनगर शहरात मागील 70 वर्षापासून कंपनी विडीचे उत्पादन करीत असून, कंपनीच्या 12 शाखा शहरात कार्यरत आहे. तर तीन ते चार हजार विडी कामगारांना रोजगार कंपनी देत आहे.
विडी कंपनीने संभाजी विडीचे नांव बदलून साबळे विडी हे स्वत:चे नांव दिले आहे. विडीचा दर्जा, पान व तंबाखू तीच राहणार असून, फक्त नांव बदलण्यात आले असल्याची माहिती नगरच्या कंपनीचे व्यवस्थापक बाबू शांतय्या स्वामी यांनी दिली. स्वारगेट पुणे येथे कंपनीचे मुख्य कार्यालय असून, महाराष्ट्र व आंध्रप्रदेशात या विडीचे उत्पादन केले जाते.
तर संपुर्ण देशात या विडीची विक्री केली जात आहे. 24 जानेवारीपासून संभाजी विडी साबळे विडी म्हणून ग्राहकांना मिळणार असल्याचे यावेळी स्वामी यांनी स्पष्ट केले. अॅड. सुधीर टोकेकर यांनी काही कारणांनी कंपनीने फक्त नांव बदलले आहे.
या कंपनीने मागील 70 वर्षापासून अनेक विडी कामगारांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. कंपनीच्या या नवीन नावाला विडी संघटनेच्या वतीने शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved