अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील या मल्टीस्टेटमध्ये 52 लाखांचा अपहार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-पारनेरमधील श्री साई मल्टीस्टेटने दुसर्‍याच्या ठेव पावत्यांवर 52 लाख रूपयांचे कर्ज काढून अपहार केल्याची घटना घडली आहे. याबाबत पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलिस ठाण्यात अरविंद रामदास घावटे (रा. शिरूर, जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरून आरोपी साई मल्टिस्टेटचे चेअरमन वसंत फुलाजी चेडे यांच्यासह संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये चेअरमन चेडे यांच्यासह दत्तात्रय सहादू सोनावळे, अशोक फुलाजी चेडे, गणेश रभाजी सांगळे, संदीप प्रभाकर रोहोकले, उज्वला आप्पासाहेब नरोडे, रेखा संतोष घोरपडे, इंद्रभान हरिभाऊ शेळके, विनायक सखाराम जाधव, ज्ञानेश्वर बाळासाहेब औटी, राजेंद्र अमृतलाल दुगड, सुनील अनंतराव गाडगे, प्रशांत राजेंद्र बढे आणि श्रीकांत पोपट झावरे यांचा समावेश आहे.

अरविंद घावटे यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे, की सन 2016 मे सन 2020 या कालावधीत मी वेळोवेळी श्री साई मल्टीस्टेट को. ऑप अ‍ॅग्रीकल्चर सोसायटी लि. पारनेर यांच्या शिरूर शाखेमध्ये प्रत्येकी एक लाख रूपयांप्रमाणे 85 लाख रूपयांच्या ठेव पावत्या एक वर्षाच्या कालावधीकरता पेन्शन ठेव म्हणून ठेवल्या. सेव्हिंग खाते क्रमांक 00093 या खात्यावर ठेवीवरील व्याज दर महिन्याला जमा होत होते. दि. 10 एप्रिल 2019 रोजी सन 2016 मध्ये ठेवलेल्या 85 लाखांच्या ठेव पावतीपैकी 20 लाख रूपयांचे कर्ज काढले.

त्या मोबदल्यात माझ्या ठेवीच्या 25 पावत्या शाखाधिकारी श्रीकांत पोपट झावरे यांनी जमा करून घेतल्या. त्याचे मी 28 ऑगस्ट 2020 पर्यत 10 लाख 35 हजार 200 रूपये संस्थेमध्ये भरले असून त्याच्या नोेंदी सेव्हिंग खात्यावर करण्यात आल्या आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये संस्थेचे चेअरमन वसंत चेडे यांनी मला फोन करून शिरूर शाखेमध्ये बोलावून घेतले. तेथे चेडे यांनी सांगितले की, आपल्या संस्थेचे ऑडिट आहे. त्याकरता तुमच्या ठेव असलेल्या 60 लाखांच्या 60 पावत्या संस्थेमध्ये आणून जमा करा. चेडे यांच्यावरील विश्वासाने मी माझ्याकडील 60 ठेव पावत्या जमा केल्या.

त्यानंतर पावत्यांची मागणी केली असता त्यांनी आज देतो, उद्या देतो असे सांगून टाळाटाळ केली. पावत्यांसाठी पाठपुरावा करत असताना मी 5 नोव्हेंबर 2020 रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय असलेल्या पारनेर शाखेत गेलो. त्यावेळी संस्थेचे चेअरमन वसंत चेडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत बढे यांची भेट घेतली. त्यावेळी चेडे व बढे यांनी माझ्यासमोर बँकेत ठेवलेल्या सर्व ठेव पावत्या व फाईल ठेवली व सांगितले की, सर्व ठेव पावत्यांवर अडीच वर्षापूर्वीच 80 टक्के कर्ज घेतले आहे.

मी त्यांना फक्त 25 लाखांच्या ठेव पावत्यांवर 20 लाख रूपयांचे कर्ज घेतल्याचे व बाकीच्या पावत्यांवर कर्ज घेतले नसल्याचे सांगितले असता त्यांनी मला माझ्या सर्व ठेव पावत्यांची झेरॉक्स दिल्या. मी संस्थेत ठेवलेल्या पावत्या पाहिल्या असता फक्त 25 पावत्यांवरच माझ्या सह्या आहेत. उर्वरित 60 ठेव पावत्यांवर माझ्या सह्या नव्हत्या. त्यावर कोणीतरी अज्ञात इसमांनी माझ्या बोगस सह्या केल्याचे आढळून आले. त्यानंतर चेअरमन चेडे यांना, मी तुम्ही ठेव पावत्या ऑडिटसाठी बँकेत जमा करण्याचे सांगितले असल्याने त्या तुमच्याकडे विश्‍वासाने आणून जमा केल्याचे सांगितले.

मी 60 ठेव पावत्या तीन महिन्यापूर्वी तुमच्याकडे आणून दिलेल्या आहेत तर अडीच वर्षापूर्वी कसे कर्ज काढू शकेल? ठेव पावत्यांवर आत्तापर्यत व्याज ही देत आलेले आहेत, असेही सांगितले. त्यावर रेकॉर्ड चेक करून सांगतो, असे चेडे म्हणाले. त्यानंतर वसंत चेडे यांनी मला वेळोवेळी फोन करून आपण काहीतरी मार्ग काढू, असे सांगत वेळ मारून नेत होते. चेडे याबाबत काहीही बोलत नाहीत, यावरून 85 लाख रूपयांच्या ठेव पावत्यांपैकी 25 पावत्यांवर कर्ज घेतले आहे.

उर्वरित 60 पावत्यांवर कर्ज घेतले नसताना ठेव पावत्यांवर संस्थेचे चेअरमन, सदस्य, कार्यकारी संचालक व शिरूर शाखेचे शाखाधिकारी यांनी बनावट कागदपत्रे तयार केल्या आहेत. संस्थेत ठेवलेल्या पावत्यांवर 52 लाख रूपयांचे कर्ज काढल्याचे दाखवून रक्कम परस्पर काढून 52 लाखांचा अपहार करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment