विद्यमान आमदारांची नीती : ‘खोटे बोल पण रेटून बोल’ या प्रमाणे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-विधानसभेचा वचपा आपण आगामी नगर पंचायत निवडणुकीत काढणार आहोत, असे स्पष्ट करत विद्यमान आमदार खोटे बोल पण रेटून बोल या प्रमाणे सोशल मीडियावर सक्रिय आहेत.

कर्जत तालुक्यात भाजपाच्या अनेक जागा आल्या असताना त्यावर आमदार दावा सांगत असून आज पर्यंत कोणत्याही आमदाराने ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत लक्ष घालत नसत मात्र यांनी सर्व बाबी गुंडाळून ठेवल्या आहेत. अशी जोरदार टीका माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी कर्जत येथे पत्रकार परिषद घेऊन केली.

कर्जत तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न झाल्या यातील राक्षसवाडी खुर्द ही बिनविरोध झालेली ग्रामपंचायत भाजपाच्या अधिपत्याखाली आहे. तर उर्वरित ५५ ग्रामपंचायती मधील ५०४ सदस्यांपैकी २३८ सदस्य भाजपाचे निवडून आले आहेत.

त्यामुळे विद्यमान आमदार रोहित पवार यांनी तालुक्यातील ८० टक्के ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याचा केलेला दावा पूर्णपणे खोटा आहे, ते सध्या खोटे बोलूनच आपले राजकारण करत असल्याचा आरोप माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी प्रा. शिंदे म्हणाले की, वास्तविक आता निकाल स्पष्ट झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्जत तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व आहे. मात्र आमदार रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यातील ८० टक्के ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीच्या आल्याचा दावा केला असून

हा खोटा व निराधार आहे. आम्ही ग्रामपंचायतीच्या संपूर्ण निकालाची प्रत घेऊनच याबाबत दावा केला असून, कुठलीही घाई गडबड न करता सर्वांची माहिती घेऊनच बोलत आहोत. तालुक्यात जानेवारी महिना संपत आला तरी कुकडीचे आवर्तन अद्याप आलेले नाही.

खरे पाहता कुकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असताना व कुकडीच्या चाऱ्या असलेल्या भागात पाण्याची गरज असताना अद्याप आवर्तन का आले नाही? असा प्रश्न उपस्थित करत पवारांची पॉवर आता कुठे गेली? असा सवाल उभा केला असून, मका खरेदी केंद्रमध्ये देखील सर्वसामान्य शेतकऱ्यांची बनवाबनवी झाली आहे.

तुर खरेदी केंद्राचा देखील शेतकऱ्याला फायदा झालेला नाही यासह अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. तालुक्यातील रस्ते केंद्र सरकार यांनी मंजूर केलेले असताना व यासाठी दोन वर्षापासून आम्ही प्रयत्न केलेले आहेत.

मात्र एखाद्या वेळी भेट घेऊन  हे रस्ते आपणच प्रयत्नातुन आणली त्यामुळे त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्लाही प्राध्यापक शिंदे यांनी दिला. तालुक्यातील कर्जत कूळधरण सह इतर रस्त्याचे काम निकृष्ट होत असताना त्याची चौकशी होत नाही असा प्रश्नही उपस्थित केला आहे.