अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- दक्षिण नगर जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य सेवेच्या दिमतीला आता नगरचे खासदार सुजय विखे यांनी १२ अॅम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) दिल्या आहेत.
प्रजासत्ताकदिनी त्यांचे लोकार्पण माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयात झाले. यावेळी नगरचे महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,
माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे, ज्येष्ठ नेते अॅड. अभय आगरकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, उपमहापौर मालनताई ढोणे,
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा व अन्य अधिकारी उपस्थित होते. खासदार निधीतून सुमारे सव्वा दोन कोटी रुपये खर्चून या १२ रुग्णवाहिका घेण्यात आल्या असून, यात व्हेंटिलेटर वगळता अन्य सर्व आवश्यक सुविधा आहेत.
नगर शहरात दोन तसेच दक्षिणेतील प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी २ रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. या रुग्णवाहिकांना जीपीएस सिस्टीम बसवली जाणार असून,
तालुक्यात त्यांच्या नियमित थांबण्याची ठिकाणेही निश्चित केली जाणार आहेत.त्यांच्या संपर्कासाठी टोल-फ्री नंबरही जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती खा. विखे यांनी दिली.
नगर शहर व दक्षिणेतील विविध तालुक्यांतील स्वयंसेवी संस्थांद्वारे या रुग्णवाहिकांचे व्यवस्थापन पाहिले जाणार आहे. रुग्णाला रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी येणाऱ्या डिझेल खर्चाइतकी रक्कम रुग्णांकडून घेतली जाणार आहे.
ड्रायव्हर व मेन्टेनन्स खर्च जिल्हा भाजप व विखे करणार आहेत. तीन महिने स्वयंसेवी संस्थांद्वारे ग्रामीण भागात ही रुग्णवाहिका सेवा दिली जाणार असून,
ती चालवण्यास काही अडचणी येत असल्यास त्यानंतर जिल्हा रुग्णालयाला सर्व रुग्णवाहिका सोपवून त्यांच्याद्वारे ही सेवा ग्रामीण भागात दिली जाणार असल्याचे डॉ. विखे यांनी सांगितले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved