जनताच पाच वर्षे तुम्हाला घरी बसवणार

Ahmednagarlive24
Published:

कोपरगाव : केंद्रात महायुतीची सत्ता आहे. राज्यातही २०१९ ला महायुतीचीच सत्ता येणार असल्याने जनताच पाच वर्षे तुम्हाला घरी बसवणार आहे, असा टोला महायुतीच्या उमेदवार आ. स्नेहलता कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांना लगावला. यांना अडीच किलोमीटर लांब ठेवा, असे विधान काळे यांनी केले होते. त्याला आ. कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले.

राज्यात केलेल्या विविध विकास कामांमुळे जनतेमध्ये युतीविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्यातरी आघाडीची सत्ता येणार नाही. इतर पक्षातील नेते व कार्यकर्ते सेना-भाजपमध्ये मेगा भरती सुरू आहे, असे त्या म्हणाल्या.आ. कोल्हे कोपरगावातील कॉर्नर सभेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील विकासकामांचा अनुभव सामान्य माणूस घेत आहे. अनेक योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे.

त्यामुळे कोणी कितीही वल्गना केल्या आणि पोकळ आश्वासने दिली, तरी जनता त्याला भीक घालणार नाही. देश बदललाय, राज्य बदललय त्यामुळे कोपरगावही या बदलाला साथ देणार आहे. कोणाबरोबर राहिल्यास विकास होईल हे जनतेला आता कळाले आहे. त्यामुळे जनता भाजपबरोबरच राहिल. तरुणांना भाजप हाच आशावाद वाटत आहे. मतदारसंघात केलेल्या विकासकामांची पावती म्हणूनच जनता पुन्हा महायुतीला निवडून देणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment