संगमनेर :- शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी काँग्रेसच्या ‘बाजीप्रभू’वर तोफ डागत निवडणुकीत जान आणली, पण हे वातावरण कायम राखण्यात महायुती यशस्वी होताना दिसत नाही.
महायुतीतील रुसवेफुगवे सुरुच असल्याने काही नेते प्रचारापासून चार हात लांब आहेत. दुसरीकडे संगमनेरची निवडणूक सोपी झाल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आघाडीच्या उमेदवारांसाठी चार दिवसांपासून राज्यात सभा घेत आहेत.

नेता बाहेर असल्याने किल्ला शाबूत ठेवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे. या मतदारसंघात आठ उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत काँग्रेसचे थोरात आणि महायुतीचे साहेबराव नवले यांच्यात आहे.
वंचित बहुजन आघाडीचे बापूसाहेब ताजणे, विखे समर्थक असलेले शरद गोर्डे मनसेनेकडून रिंगणात आहेत. बहुजन मुक्ती पार्टीचे संपत कोळेकर, अविनाश भोर, कलीराम पोपळघट, बापू रणधीर हे तिघे अपक्ष आहेत.
संगमनेरमध्ये विखे पिता-पुत्रांनी लक्ष घालत येथे घरातील उमेदवार देण्याचे संकेत पूर्वी दिले होते. त्यामुळे थोरातांविरोधात विखे परिवारातील सदस्य मैदानात उतरणार असल्याने व शिर्डीतदेखील थोरातांकडून तगडा उमेदवार दिले जाण्याचे संकेत देण्यात आल्याने संगमनेर-शिर्डीकडे राज्याचे लक्ष लागले होते.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी लढतीचे स्पष्ट झाले आणि थोरात, विखे निर्धास्त झाले. थोरात यांच्याविरोधात महायुतीकडून नवले यांची उमेदवारी पुढे आली. संगमनेरमध्ये महायुतीचे हक्काचे ४० हजार मतदान आहे.
गतवेळी सेनेचे जनार्दन आहेर यांनी बऱ्यापैकी लढत दिल्याने हा आकडा ४४ हजारांवर गेला. नवले यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याचे पडसाद शिवसेनेत उमटले. निष्ठावंताला उमेदवारी नाकारल्याने अनेकजण नाराज झाले.
परिणामी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अप्पासाहेब केसेकर बंडखोरी करण्याची शक्यता निर्माण झाली. अर्ज दाखल करण्याचे संकेत त्यांनी दिल्यानंतर वरिष्ठांची धावपळ उडाली. त्यांना थांबवण्यात यश मिळाले, तरी ते प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसत नाही.
ठाकरे यांच्या सभेत त्यांनी व्यासपीठावर बसण्यास नकार देत लोकांमध्ये बसणे पसंत केले. नवले यांच्यासाठी संगमनेरातील विखे समर्थक प्रचारात सक्रिय झाले आहे. नवले यांच्यासह ते गावाेगावी छोट्या सभा घेऊन भूमिका मांडत आहेत.
दुसरीकडे थाेरात यांच्यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे तीन दिवसांपासून मतदारसंघात बैठका, सभा घेत आहेत. आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, रणजित देशमुख, शरयू देशमुख, डॉ. जयश्री थोरात, इंद्रजित थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते किल्ला सांभाळत आहेत.
- ‘या’ महिन्यात सुरु होणार देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ! देशाला मिळणार तब्बल 80 वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट
- इंग्रजी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळा लई भारी, उद्याचा भारत घडवणारी पिढी याच शाळेतून तयार होतेय!- आमदार किरण लहामटे
- भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी पंसतीची नावे बंद पाकिटात! जिल्हाध्यक्ष निवडीचा फैसला गेला वरिष्ठांच्या हाती!
- Snapdragon 8 Elite, ड्युअल कॅमेरा सह 80W चार्जिंग; वनप्लसचा नवा फोन भारतीय बाजारात घालणार धुमाकूळ, लाँचिंग डेट जाहीर
- श्रीरामपूरच्या या ५२ गावांना मिळणार शुद्ध पाणी! ३०० कोटी रूपयांच्या योजनांची कामे सुरू!